भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर झालेले – नाना पटोले

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, त्यामुळे भाजपाचा बेबनाव उघड झाला आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महिला आरक्षणचा कायदा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्वतःचा मोठा सत्कार करून घेतला होता, आता मात्र ते विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपाला सत्तेचा माज आला आहे, हे वरळीतील मोर्चात दिसून आले, मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेने संताप व्यक्त केला तो योग्यच होता, त्या महिलेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. लोकांना भाजपाचा खरा चेहरा कळलेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले..

प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करणार…

भाजपा युती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. सरकारमध्ये काही आलबेल नाही, तीन तिघाडा काम बिघाडा आहे, मंत्र्यांमध्येच मलई खाण्याची स्पर्धा लागलेली नाही तर प्रशासनातील वरिष्ठ आयएएस अधिकारीही भ्रष्टाचारात आकंठ बुडले आहेत. राज्यातील चार आयएएस अधिकारी जमीन व्यवहारात फुटपट्टीने मोजून पैसे वसूल करतात, त्यांची फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे, त्यांनी कारवाई नाही केली तर विधानसभेत हे प्रकरण मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

देशाला ‘नरक’ म्हटले तरीही मोदी गप्पच का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर भारत गहाण ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानला नरक म्हणतात आणि तरिही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. हिंदुस्थान स्वर्ग आहे असे आपले साधू संत सांगतात मग डोनाल्ड ट्रम्प नरक म्हणतात, त्यावेळी राग आला पाहिजे मोदी गप्प बसले आहेत पण सरसंघचालक मोहन भागवत का गप्प बसले आहेत. नरेंद्र मोदी ट्रम्पला सरेंडर झाले आहेत हे पुन्हा पुन्हा दिसत आहे, यांच्या पापाचा घडा आता भरला आहे, असेही नाना पटोले म्हणाले..

Comments are closed.