वाल्मिक कराड जेलमध्ये की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये! बीड तुरुंगातील कैद्याची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, केला खळबळजनक दावा
बीड जिल्हा कारागृहातील अंतर्गत अनागोंदी कारभाराचे एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अझहर पठाण नंतर आता कैदी सनी आठवले याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये सनीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा कारागृहात मोठा दबदबा असल्याचे म्हटले आहे. कारागृह प्रशासन पूर्णपणे कराडच्या दबावाखाली असून त्याला डिश टीव्हीसारख्या ‘व्हीआयपी’ सुविधा पुरवल्या जात असल्याचा खळबळजनक दावा या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या संभाषणात सनी आठवले सांगतो की, दुसरा कैदी अझहर पठाण याला अमानुष मारहाण करण्यात आली असून त्याचा खुबा निखळला आहे. मात्र, वाल्मिक कराडने 10 हजार रुपयांची कॅन्टीन आणि पैशांचे आमिष दाखवून अझहरवर दबाव आणला आणि जबाब बदलण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, बंदी असतानाही रात्री साडेआठ वाजता कराडला बाहेर काढून त्याचे जबाब घेतले जात असल्याचा आरोप सनीने केला आहे. कारागृहातील या गैरप्रकारांची वरिष्ठ स्तरावरून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी मागणी त्याने केली आहे. तसेच सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय, असा दावाही त्याने केला आहे.
या प्रकरणाने बीड कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाल्मिक कराडकडे अनधिकृत सिमकार्ड्स उपलब्ध असून त्याला प्रशासनातील कोणाचे पाठबळ मिळते, याची आपल्याला पूर्ण माहिती असल्याचा दावाही सनीने केला आहे. दरम्यान, आपले तोंड बंद करण्यासाठी आपली बदली दुसऱ्या कारागृहात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्याने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एखाद्या बाह्य तपास पथकामार्फत झडती आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments are closed.