Pune News – बेलसर टोल नाक्यावर स्थानिकांचा एल्गार; टोल वसुली विरोधात जोरदार आंदोलन

पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील बेलसर टोल प्लाझावर शुक्रवारपासून (दि. 24) टोल वसुली सुरू करण्यात आली. मात्र, ठेकेदार कंपनीने वसुली सुरू करताच जेजुरी, साकुर्डे, बेलसर, तक्रारवाडी, शिवरी, खळद, वाळुंज, नीळुंज, वाल्हे, दौडज, मावडी या परिसरातील शेकडो ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर धाव घेत जोरदार आंदोलन केले. यावेळी झालेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून टोल प्लाझापासून 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक भूमिपुत्रांच्या वाहनांना पूर्णतः टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने स्थानिकांना 350 रुपयांचा मासिक पास घेण्याचे सुचवले होते, परंतु स्थानिकांनी तो फेटाळून लावत पूर्ण माफीसाठी आग्रह धरला. शुक्रवारी सकाळी ‘एमएपी इंटरप्रायझेस’ या कंपनीने अचानक वसुली सुरू केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.

आंदोलनाची माहिती मिळताच जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती हाताळली. यावेळी मनसे, संभाजी ब्रिगेड, शिवसेना यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढता तणाव पाहून टोल व्यवस्थापक नितीन वाकले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर, तूर्त 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक नागरिकांकडून टोल वसुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत स्थानिकांनी आपले आधार कार्ड दाखवून टोल प्लाझाच्या डाव्या बाजूने आपली वाहने न्यावीत, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि. 28) जेजुरी येथील शासकीय विश्रामगृहात आंदोलक, शासन, पोलीस आणि टोल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपर्यंत स्थानिकांना दिलासा मिळाला असला, तरी बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.