बुलंदशहरमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक

बनावट ओळखपत्राद्वारे वास्तव्य : मूळचा न्यू कराचीचा रहिवासी

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोलिसांनी एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. तो त्याठिकाणी बनावट ओळखपत्राद्वारे तयार केलेल्या भारतीय कागदपत्रांचा वापर करून राहत होता. आरोपीकडून एक बनावट आधार कार्ड, एक ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक पाकिस्तानी पासपोर्ट जप्त करण्यात आला. बसीद अली इरशाद असे संबंधिताचे नाव असून त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. 2012 मध्ये त्याला मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात परदेशी नागरिक कायद्याच्या कलमांखाली तुरुंगवास झाला होता.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार आणि शहर पोलीस अधीक्षक अभिषेक प्रताप अजय यांच्या नेतृत्वाखालील एक पोलीस पथक संशयितांचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी घेराव घालून बसीद अली इरशादला अटक केली. सदर आरोपी मूळचा पाकिस्तानमधील न्यू कराचीचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गुन्हेगारी नियंत्रण मोहिमेचा एक भाग म्हणून कोतवाली नगर पोलिसांनी या कारवाईच्या माध्यमातून मोठे यश मिळवले आहे.

आरोपीने आपली ओळख लपवून, सुशीला विहार (भूद) येथील पत्त्यावर बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले होते. विविध कार्यालयांमध्ये केलेल्या पोलीस पडताळणीत ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. आरोपीच्या आईकडे दीर्घकालीन व्हिसा होता आणि आरोपीनेही व्हिसासाठी अर्ज केला होता. याची पडताळणी सध्या शासकीय पातळीवर विचाराधीन आहे.

Comments are closed.