पश्चिम बंगाल यावेळी क्रांती घडवून आणेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, प्रचार शिगेला, द्वितीय टप्प्याचे मतदान येत्या बुधवारी केले जाणार

► वृत्तसंस्था/ पानीहाती (पश्चिम बंगाल)

‘पश्चिम बंगालमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाची प्रबळ लाट आहे. मतदानाच्या प्रथम टप्प्यात मतदारांनी जो उत्साह दाखविला त्यातून हे सिद्ध होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना आणि धमक्यांना भीक न घालता कोट्यावधी मतदारांनी निर्भयपणे मतदान केले आहे. यावेळी या राज्यात क्रांती घडणार आहे. मतदानाच्या द्वितीय टप्प्यातही मतदार असाच उत्साह दर्शविणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव यांची निश्चिती झाली आहे,’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते शुक्रवारी कोलकात्याच्या नजीक पानीहाती येथे एका अतिविशाल जाहीर प्रचार सभेत भाषण करीत होते.

गुरुवारी पार पडलेल्या मतदानाच्या प्रथम टप्प्यात 152 मतदारसंघांमध्ये साधारणत: 93 टक्के मतदान झाले होते. हा या राज्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. हे प्रचंड मतदान पाहून तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व हादरुन गेले आहे. या पक्षाला आता आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे आता द्वितीय टप्प्यात हा पक्ष आपल्या गुंडांना अधिक प्रमाणात सज्ज करीत आहे. मतदारांना घाबरविण्याचा प्रयत्न हा पक्ष अधिक मोठ्या प्रमाणात करणार, हे निश्चित आहे. मात्र, मतदार अत्यंत साहसाने आणि सुजाणपणे हा प्रयत्न हाणून पाडतील आणि प्रचंड संख्येने मतदान करतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. या द्वितीय टप्प्यातही विक्रमी मतदान होईल आणि राज्यात सत्तापरिवर्तन घडेल, असे भाकित त्यांनी सभेत केले.

पिडीतेची माता संघर्षात

पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टर विद्यार्थिनीवर निर्घृण बलात्कार करण्यात येऊन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पिडीतेच्या मातेला भारतीय जनता पक्षाने पानीहाती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मातेच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर या मातेने पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याला भयमुक्त करणार

मध्यमवर्गाच्या हिताला आमचे प्राधान्य असेल. आम्ही पश्चिम बंगाल राज्याला गुंडगिरी, भ्रष्टाचार, खंडणीखोरी, कटमनी, महिलांवर होणारे अत्याचार, राज्यातून अन्यत्र होणारे स्थलांतर, राज्यात होणारी विदेशी समाजकंटकांची घुसखोरी आदी संकटांपासून मुक्त करणार आहोत. या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर आम्ही राज्याचा सर्वांगिण विकास आणि रोजगारनिर्मिती यांच्यावर जास्तीत जास्त भर देणार आहोत, असे त्यांनी भाषणात स्पष्ट केले आहे.

गंगा हा या राज्याचा आत्मा

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौकेतून हुगळी नदीतून काहीकाळ प्रवास केला. या प्रवासात त्यांनी छायाचित्रणही केले. ही छायाचित्रे त्यांनी ‘एक्स’ या माध्यमातून प्रसारित केली आहेत. कोलकाता येथे त्यांनी हुगळी नदीच्या तीरावर प्रार्थनाही केली. पश्चिम बंगालच्या जनतेच्या हितासाठी मी शक्य तितके सर्व प्रयत्न करणार आहे. गंगा नदीला पश्चिम बंगालच्या संस्कृतीत एक विशेष स्थान आहे. गंगामाता हा या राज्याचा आत्माच आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

द्वितीय टप्प्यासाठी सज्जता

येत्या बुधवारी पश्चिम बंगालमध्ये द्वितीय आणि अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे. हे मतदान 142 मतदारसंघांमध्ये होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या टप्प्यातील मतदारासाठी सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे. प्रथम टप्प्यात तुलनेने शांततेत मतदान पार पडले होते. मतदानाची टक्केवारी विक्रमी राहिली.

आता द्वितीय टप्प्याची उत्सुकता

ड प्रथम टप्प्यात विक्रमी मतदान झाल्याने वाढली द्वितीय टप्प्याची उत्सुकता

ड 142 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या सज्जतेसाठी निवडणूक आयोग कटिबद्ध

ड अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रांसाठी विषेश सुरक्षा व्यवस्था

ड भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्पर्धेसाठी उत्सुक

Comments are closed.