राजस्थान विधानसभेत बॉम्बस्फोटाची धमकी
ईमेल मिळाल्यानंतर एटीएस सतर्क, शोधमोहीम सुरू
वृत्तसंस्था/ जयपूर
जयपूरमधील राजस्थान विधानसभेला शुक्रवारी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ सतर्क झाले. विधानसभा इमारत आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिसराची पाहणी करून तो सुरक्षित करण्यासाठी एटीएस, बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाला तैनात करण्यात आले. राजस्थान पोलीस देशभरातील इतर संस्थांच्या सहकार्याने या धमकीमागील सूत्रधारांचा तपास करत आहेत. हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे.
पोलिसांनी राजस्थान विधानसभेला बॉम्बच्या धमकीची माहिती दिली. ‘बॉम्बची धमकी ईमेलद्वारे मिळाली. हे केवळ राजस्थानपुरते मर्यादित नाही; इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या धमक्या मिळत आहेत’, असे डीजीपी राजीव शर्मा म्हणाले. राजस्थान विधानसभेला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी तात्काळ परिसराची कसून तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी अशी घटना आहे.
Comments are closed.