आंबी कुटुंबीयांचा विरोध असूनही संजय गायकवाडांविरोधात ‘अदखलपात्र’ गुन्हा, चळवळीतील कार्यकर्ते आज

संजय गायकवाड : दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोनवरून दिलेल्या धमकीप्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र (Non-Cognizable) गुन्ह्याची नोंद केल्याने आंबी कुटुंब आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Sanjay Gaikwad: नेमकं प्रकरण काय?

38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून कोल्हापुरात याचे तीव्र पडसाद उमटले.

Sanjay Gaikwad: रोहित पवारांची एन्ट्री आणि पोलीस ठाण्यातील राडा

काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार शेकडो कार्यकर्त्यांसह राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई होऊन गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, पोलीस ठाण्याबाहेर डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करत निषेध नोंदवला. सुमारे दीड तास चाललेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते.

Sanjay Gaikwad: पोलिसांची भूमिका आणि कुटुंबीयांचा विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मध्यरात्री वकिलांचा सल्ला घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ‘अदखलपात्र’ गुन्ह्याची नोंद केली. मात्र, आंबी कुटुंबीयांची मागणी ही ‘दखलपात्र’ (Cognizable) गुन्हा दाखल करण्याची होती. कुटुंबीयांचा विरोध असतानाही पोलिसांनी परस्पर सौम्य कलमान्वये गुन्हा नोंदवल्याचा आरोप आता केला जात आहे.

Sanjay Gaikwad: आजची रणनीती

पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आंबी कुटुंबीय आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आज हे सर्व कार्यकर्ते आणि आंबी कुटुंबीय अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आजच्या भेटीत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण…; संजय गायकवाडांना उपरती, भूमिकेवर ठाम

संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटलं ते विचारणार, मी देखील ते पुस्तक वाचलं नाही : उदय सामंत

आणखी वाचा

Comments are closed.