Nanded crime news – चाललंय काय… नांदेडमध्ये पुन्हा एक खून; 25 वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये फेरबदल झाल्यानंतरही रक्तपाट थांबण्याचे नाव नाही. आता वाडी परिसरामध्ये 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रताप दत्ता गायकवाड (वय – 25) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नांदेड शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांच्याकडे पदभार देण्यात आला. शुक्रवारी सकाळीत त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर 24 तासात नांदेडमध्ये पुन्हा एक खून झाला. घराकडे जाणाऱ्या प्रताप गायकवाड याच्यावर तिघांनी सपासप वार केले. रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रताप गायकवाड आणि सुरज बुक्तरे यांच्यात वाद झाला होता. हा वाद मारामारीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झआली होती. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रियाही कण्यात आली होती. याचाच बदला म्हणून सुरज बुक्तरे, विजय वायवळ आणि सोनु उर्फ अनिकेत बुक्तरे या तिघांनी प्रतापवर धारदार शस्राने हल्ला केला. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस स्थानकाचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.

Comments are closed.