खराब हवामानामुळे काठमांडूला जाणारी विमाने लखनौकडे वळवली; प्रवाशांचा खोळंबा
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा अचानक हवामान बिघडल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दृश्यमानता कमी झाल्याने आणि खराब हवामानामुळे काठमांडूच्या दिशेने जाणारी तीन आंतरराष्ट्रीय विमाने उत्तर प्रदेशातील लखनौ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली. यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री शारजाहून काठमांडूला जाणारे ‘एबीवाय 530’ हे विमान रात्री 10:45 वाजता लखनौमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हाँगकाँगहून येणारे ‘सीएक्स 603’ हे विमान रात्री 10:48 च्या सुमारास लखनौ विमानतळावर वळवण्यात आले. तसेच बँकॉकहून काठमांडूकडे झेपावलेले तिसरे विमान मध्यरात्री 12:00 वाजता लखनौच्या अमाउसी विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. काठमांडू विमानतळ प्रशासनाने हवामान खराब असल्याचे संकेत दिल्यानंतर वैमानिकांनी लखनौ विमानतळाशी संपर्क साधून हे पाऊल उचलले.
रात्रभर लखनौमध्ये थांबल्यानंतर, शनिवारी सकाळी काठमांडूमधील हवामानात सुधारणा झाली. त्यानंतर ही तिन्ही विमाने सकाळी उशिरा आपल्या नियोजित स्थळी रवाना झाली. दरम्यान, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच अनेक उड्डाणे रद्द झाली असताना, आता निसर्गाच्या लहरीपणामुळे नेपाळच्या हवाई सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.