Jalna News – बदनापूरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा अपहार; बँक अधिकार्यासह इतरांवर गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची सुमारे 7 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्ही. यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बँकेचे अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बँकेच्या धोरणानुसार सुरू असलेल्या सुवर्ण कर्ज पाकिटांच्या प्रेमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उघड झाला. 22 एप्रिल 2026 रोजी तपासणी सुरू असताना काही पाकिटे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
सोन्याची चोरी व बनावट दागिने
तपासात एकूण 22 सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, ज्यांची किंमत 3.79 कोटी रुपये आहे. तसेच, स्ट्रॉग रूममधून 30 सोन्याची पाकिटे (किंमत 3.52 कोटी रुपये) गायव असल्याचे निष्पन्न झाले आहे. 23 एप्रिल रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्रॉग रूममधून सोन्याची पाकिटे चोरून खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. तक्रारीनुसार, बँक अधिकारी संजय डोंगरे यांनी प्रत्यक्ष चोरी केली. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून डोंगरे यांना स्ट्रॉग रूममध्ये एकटे सोडून कर्तव्यात कसूर केली. तर सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुर्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक करण्यात साथ दिली.
शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, बँक अधिकारी संजय डोंगरे, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुर्हाडे यांच्यावर कलम 316(5), 318(4), 316(2), 306, 338, 336(3), 340(2), 3(5) भारतीय न्याय संहीता प्रमाणे पोलीस ठाणे बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून पदाचा गैरवापर करत बँकेचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई आणि रकमेची वसुली करण्याची मागणी बँकेतर्फे करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे हे करीत आहे.
Comments are closed.