केएल राहुलचे धमाकेदार शतक; ख्रिस गेल आणि रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2026 च्या ३५ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात काही खास झाली नाही. तिसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने दिल्लीला मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर सलामीवीर केएल राहुलने नितीश राणासोबत मिळून पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि १० षटकांत संघाची धावसंख्या १०० च्या पार नेली. काही वेळातच केएल राहुलने धमाकेदार शतक झळकावून एक मोठा पराक्रम केला.

​केएल राहुलने १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शानदार चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्याने केवळ ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेलची बरोबरी केली. केएलच्या बॅटमधून आलेले आयपीएलमधील हे ६ वे शतक आहे. गेलच्या नावावरही आयपीएलमध्ये ६ शतके आहेत. आता आयपीएलमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमापासून राहुल केवळ २ शतके दूर आहे. कोहलीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ८ शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे.

​विशेष म्हणजे, राहुलच्या ६ आयपीएल शतकांमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले. यापूर्वी, २०२२ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ५६ चेंडूत आपले वेगवान शतक झळकावले होते. आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रमही राहुलच्या नावावर झाला आहे. त्याने २०१८ मध्ये याच मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ऋषभ पंतने केलेल्या १२८* धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

​केएल राहुलने ख्रिस गेलशिवाय दिग्गज रोहित शर्माचीही बरोबरी केली आहे. केएल राहुलचे टी-२० क्रिकेटमधील हे 8 वे शतक आहे. अशा प्रकारे तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ‘हिटमॅन’च्या बरोबरीने पोहोचला आहे. आता केएल आणि रोहित या दोघांच्याही नावावर टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी ८ शतके आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम विराट कोहली आणि अभिषेक शर्मा यांच्या नावावर आहे; या दोघांनीही प्रत्येकी ९ शतके झळकावली आहेत.

Comments are closed.