आधी नाकेबंदी हटवा मगच बोलू, इराणने ठणकावले; अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराण आणि अमेरिकेतील शांतता चर्चा आणि वाटाघाटींचा पेच सुटत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाकेबंदीच्या मुद्दय़ावरून इराणने अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास नकार दिला असून पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडे आपले मुद्दे मांडण्याची ठाम भूमिका इराणने घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांची भेट घेऊन इराणच्या अटी तसेच अमेरिकेच्या मागण्यांवरील आक्षेप पाकिस्तानकडे सोपविले आहेत. त्यानंतर इराणचे शिष्टमंडळ इराणला परतले. तर अमेरिकेचे विशेष दूत  स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्ब्प यांनी रद्द केला. इराणला चर्चा हवी असेल तर थेट अमेरिकेशी स्वतः संपर्क करावा, असे ट्रम्प म्हणाले.

अब्बास अराघची हे शुक्रवारी पाकिस्तानात दाखल झाले होते. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात थेट चर्चा होईल, असा दावा ट्रम्प प्रशासनाने केला होता. मात्र, इराणने तो फेटाळला. मात्र, शहबाज शरिफ यांची भेट घेऊन अराघची यांनी इराणच्या अटी व आक्षेप सोपविले. या बैठकीत पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर हेदेखील उपस्थित होते. दिवसभर झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर इराणचे शिष्टमंडळ इराणकडे सायंकाळी रवाना झाले. पाकिस्तान दौऱ्यानंतर अराघची हे रशिया आणि ओमानचा दौरा करणार आहेत.

नाकेबंदी राखले ठेवल्यास चोख प्रत्युत्तर देऊइराणचा इशारा

अमेरिकेने होर्मुझ आणि इतर बंदरांची नाकेबंदी कायम ठेवल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या लष्कराच्या मुख्यालयाने सांगितले की सैन्य आधीपेक्षा मजबूत असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

सागरी सुरुंग हटविण्यास मदतीची तयारी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने सागरी सुरुंग पेरलेले आहेत. ते हटविण्यासाठी तुर्किये आणि जर्मनीने मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, युद्ध पूर्णपणे थांबल्यानंतरच आम्ही मदत करू, असे जर्मनीने स्पष्ट केले आहे. युद्ध थांबल्यानंतर तसेच संसदेने मंजुरी दिल्यावरच माइन्सस्वीपर जहाज भूमध्य सागरात तैनात करू, असे जर्मनीने म्हटले आहे.

तेहरांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू

युद्धबंदीनंतर तेहरान येथील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खुमैनी हे पुन्हा सुरू करण्यात आले. इराण एअरलाइन्सची काही उड्डाणे इस्तंबुल आणि मस्कत येथे रवाना झाली. हळूहळू देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने रोखले इराणकडे जाणारे जहाज

अमेरिकेच्या नौदलाने इराणचा झेंडा असलेले इराणकडे जाणारे एक जहाज रोखले. अमेरिकेच्या या नाकेबंदीमुळे इराणने थेट चर्चेस नकार दिला आहे. आतापर्यंत अमेरिकेने 33 जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे.

इराणकडून एक ऑफर; ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणकडून एक ऑफर आम्हाला मिळाली आहे. मात्र, त्याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. या ऑफरवर विचार करू. जे लोक इराणमध्ये सत्तेत आहेत, त्यांच्याशीच चर्चा सुरू आहे.

Comments are closed.