लेट द शो गो ऑन! गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे तोंडभरून कौतुक
जगप्रसिद्ध व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यातून ट्रम्प बालंबाल बचावले असून त्यांनी स्वत: आपण आणि आपले सर्व सहकारी सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे. अचानक झालेल्या या गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने हातामध्ये शस्त्र घेऊन संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या घटनेनंतर अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. यावर आता ट्रम्प यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे तोंडभरून कौतुक केले आहे.
वॉशिंग्टन हिल्टनमधील बॉलरूममध्ये नर्ड प्रोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका हल्लेखोराने सुरक्षा चेकपॉईंट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला. या चकमकीत सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला आहे. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. यानंतर सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले.

Comments are closed.