। अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
>> संध्या शहापुरे
मूळ वाल्मिकीरामायणत असलेली अहल्या उद्धाराची कथा इथे सांगावी वाटते. मोहवश झालेल्या अहल्येला आणि फसवणूक करणाऱया या इंद्राला सदाचरणी महर्षी गौतम ऋषी शाप देतात. इंद्राला, विफल (अंडकोष रहित) होण्याचा आणि अहल्येला ‘हजारो वर्षे केवळ हवा पिऊन उपवास करून राखेत पडून राहण्याचा, तसेच समस्त प्राणीमात्रांचेही दर्शन घडणार नाही’ (यालाच शिळा होऊन राहणे असे म्हटले गेले) असा एकाकी जीवनाचा शाप गौतमऋषि देतात. आणि जेव्हा दशरथ नंदन राम आश्रमात येतील तेव्हा तू पवित्र होशील असा उःशाप देतात. श्रीराम जेव्हा गौतम ऋषींच्या सुनसान झालेल्या आश्रमात प्रवेश करतात तेव्हा त्यांना दिसते की, ‘ददर्श महाभागां तपसा द्योतीतप्रभान। लोकैरपी समागम्य दुर्निरीक्ष्यां सुरासुरै।। अर्थात – ‘महासौभाग्यशालीनी अहल्या, आपल्या तपस्येने देदीप्यमान झाली आहे. ते तेज इतके होते की देवदेवता किंवा असुरही तिच्याकडे पाहू शकत नव्हते.’ श्रीरामाचे दर्शन अहल्येला होताच, ‘त्रयाणामपि लोकांना यावद् रामस्य दर्शनाम्। शापसस्यान्त मुपागम्य तेषां दर्शनमागता।। तिच्या शापाचा अंत झाला आणि तिन्ही लोकांतील सर्व प्राणीमात्रांना अहल्येचे दर्शन घडले. श्रीरामाच्या दर्शनाने पूजनाने अहल्येचा उद्धार झाला. असा रामराया आपल्यासारख्या रामोपसाना करणाऱया भक्तांची उपेक्षा कधीही करणार नाही.
Comments are closed.