कलर टूर – व्होल्गावरील बार्ज होलर्स
>> दुष्यंत पाटील, [email protected]
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जहाज ओढणाऱया मजुरांचं रशियातील आयुष्य पाहून अस्वस्थ झालेल्या चित्रकार रेपिनने त्यांचं जीवन कॅनव्हासवर आणलं आणि साकारलं ‘बार्ज हॉलर्स ऑन द व्होल्गा’ हे चित्र. गरीब लोक कष्टाचं, संघर्षाचं आयुष्याचं प्रतीक ठरलेल्या या चित्रा नंतर रशियात ‘मानवतावादी’ चित्रं काढण्याची लाटच आली.
पूर्वीच्या काळी (अठरावं, एकोणिसावं शतक) रशिया आजच्यासारखा विकसित नव्हता. रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं मोठय़ा प्रमाणात पसरलं नसल्यानं त्या काळात बरीचशी मालवाहतूक व्होल्गा नदीतून व्हायची. नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं जहाज नेताना फारशी अडचण नव्हती. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जहाजं नेताना अडचण होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाफेची इंजिन्स यायला सुरुवात झाली, पण त्यांच्या किंमती थोडय़ा जास्त होत्या.
मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ही जहाजं न्यायची कशी? या काळात मजूर लोक जहाजाला बांधलेला दोरखंड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ओढत न्यायचे! हे अगदीच अमानुष काम होतं. या मजुरांना ‘बार्ज हॉलर्स’ किंवा ‘बुरलाकी’ या नावानं ओळखलं जायचं. पाण्यातलं जहाज खेचताना हे मजूर किनाऱयावरून चालायचे. ऊन असो वा पाऊस, त्यांना विश्रांतीची परवानगी नव्हती. हे मजूर आपल्या खांद्याला चामडय़ाचा एक रुंद पट्टा बांधायचे, ज्याला लांब दोरखंड जोडलेला असायचा. हा दोरखंड नदीत उभ्या असलेल्या जहाजाला बांधलेला असायचा. नदीच्या चिखलमय किंवा रेताड काठावरून हे लोक एका लयीत पावले टाकत जहाज ओढायचे. हे काम तासन्तास चालायचं. भर उन्हात, पावसात किंवा थंडीतही त्यांना हे करावं लागायचं. खांद्यावरच्या पट्टय़ामुळे त्यांची अक्षरशः कातडी सोलून निघायची. दररोज 15 ते 25 किलोमीटर्स इतकं अंतर ते पार पडायचे. व्होल्गा नदी अतिशय लांब असल्यानं बऱयाचदा या मजुरांना 2 हजारपेक्षा जास्त किमी जहाज ओढायला लागायचं. रशियात अक्षरशः लाखो लोक हे जहाज ओढण्याचं काम करायचे.
वारा उलटय़ा दिशेनं असेल किंवा नदीचा प्रवाह वेगात असेल तर जहाज ओढणं अजूनच कठीण व्हायचं. तसंच किनाऱयाला चिखल असेल तरीही चालताना त्रास व्हायचा. मग नेहमीपेक्षा कमी अंतर प्रवास व्हायचा. या मजुरांना इतक्या भयानक कष्टांचा मोबदलाही फारसा मिळायचा नाही. जेमतेम दोन वेळचं जेवण मिळेल इतकेच पैसे त्यांना मिळायचे. या मजुरांना हिवाळ्यात पाणी गोठत असल्यानं काम करता यायचं नाही. त्यामुळे हिवाळ्यात त्यांना पोटापाण्यासाठी वेगळं काम शोधायला लागायचं.
एका बाजूला गरीब लोक कष्टाचं, संघर्षाचं आयुष्य जगताना श्रीमंत लोक मात्र चैनीचं आयुष्य जगण्यात मग्न होते. त्यांना गरीबांच्या कष्टाशी फारसं देणंघेणं नव्हतं. चित्रकार लोक अशाच श्रीमंतांसाठी चित्रं काढायचे. त्यामुळे त्यांच्या कलेमध्ये एक तर पौराणिक विषय यायचे किंवा श्रीमंतांची व्यक्तिचित्रं यायची.
काही चित्रकार या वर्तुळातून बाहेर पडले. हे त्या काळचे ‘बंडखोर’ कलाकार होते. त्यांनी सरकारी आर्ट अकॅडमीचे नियम झुगारून दिले होते. त्यांना आपली चित्रं फक्त राजवाडय़ांत किंवा श्रीमंतांच्या बैठकीत ठेवायची नव्हती. त्यांनी आपली चित्रं प्रदर्शनाच्या माध्यमातून रशियाच्या कानाकोपऱयात, खेडय़ापाडय़ात नेली (म्हणून त्यांना `Wanderers` किंवा ‘भटके’ म्हणतात). हा गट कलेतून समाजसुधारणा घडवून आणणाऱया ‘लोकचळवळी’सारखा होता. याच गटातला एक चित्रकार विश्वविख्यात झाला. त्याचं नाव इल्या रेपिन.
जहाज ओढणाऱया मजुरांचं आयुष्य पाहून रेपिन अतिशय अस्वस्थ झाला. या मजुरांचा अभ्यास करण्यासाठी त्यानं त्यांच्यासोबत काही काळ आयुष्य घालवलं. रेपिनला त्यांचं जीवन कॅनव्हासवर आणायचं होतं. यासाठी त्यानं ‘बार्ज हॉलर्स ऑन द व्होल्गा’ हे चित्र काढलं.
चित्रात आपल्याला नदीच्या किनाऱयावर अकरा मजूर एका मोठय़ा जहाजाला दोरखंडानं ओढताना दिसतात. चित्र पाहताना आपल्याला तिथे कडक ऊन असल्याचं जाणवतं. नदीचा काठ रेताड आणि कोरडा आहे. या मजुरांच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. त्यांचे खांदे दोरखंडाच्या सतत घासण्यानं सोलले असावेत असं वाटतं. एवढय़ा भीषण परिस्थितीतही हे लोक पाय रोवून उभे आहेत. चित्रात मागे दूरवर एक वाफेवर चालणारं जहाज धूर सोडताना दिसतंय. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान येत होतं, पण दुसरीकडे माणसांना मात्र जनावरांसारखं राबवलं जात असल्याचं चित्रात दिसतंय.
जेव्हा हे चित्र 1873 मध्ये पहिल्यांदा जगासमोर आलं, तेव्हा रशियात जणू काही भूकंपच झाला! लोक या चित्राकडे बघून चकित झाले, कारण असं काहीतरी याआधी कुणी धाडसानं मांडलं नव्हतं. सामान्य लोकांना हे चित्र खूप भावलं. त्यांना वाटलं की, पहिल्यांदाच कुणीतरी गरीबांचं दुःख इतक्या प्रामाणिकपणे मांडलंय. रशियाचे महान लेखक लिओ टॉलस्टॉय यांनीही या चित्राची प्रशंसा केली होती. काही श्रीमंत लोकांना हे चित्र बघून संताप आला. त्यांना वाटलं की, रेपिनने रशियाची ‘गरीब आणि मागासलेली’ बाजू जगाला दाखवून देशाची बदनामी केली आहे. त्यांना राजवाडे आणि फुलांची चित्रं पाहायची सवय होती, त्यामुळे हे ‘मळलेले मजूर’ त्यांना खुपले.
हे चित्र कलेच्या इतिहासातलं एक मैलाचा दगड ठरलं. यानंतर रशियात ‘मानवतावादी’ चित्रं काढण्याची लाटच आली.
Comments are closed.