मोबाईल टॉवरवर 560 दिवस

आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन करणे, ही पद्धती साऱ्या जगात इतिहासकाळापासून रुढ आहे. बहुतेक आंदोलने मोर्चे काढून, धरणे देऊन किंवा तत्सम मार्गांनी केली जातात. तथापि, काही आंदोलनकर्ते त्यासाठी कुणी कल्पनाही करु शकणार नाही, असे मार्ग शोधतात. पंजाबमध्ये अशाच एका अभूतपूर्व आंदोलनाची नुकतीच सांगता झाली आहे. या राज्यातील गुरुजितसिंग खालसा नामक एक व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून आणि तब्बल 560 दिवस तेथेच वास्तव्य करुन आंदोलन पेले आहे. शीखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहेब’ची अवमानना करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुजितसिंग खालसा यांनी अशा प्रकारे आंदोलन केले. अखेर जवळपास दोन वर्षे सात महिन्यांच्यानंतर त्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले आणि ते मोबाईल टॉवरवरुन खाली उतरण्यास राजी झाले. त्यांचे हे आंदोलन सर्वतोमुखी झाले असून तो कदाचित साऱ्या जगातील विक्रम असावा, असे काहींचे मत आहे.

12 ऑक्टोबर 2024 या दिवशी गुरुजितसिंग खालसा हे पतियाळा शहरातील समाना येथील मोबाईल टॉवरवर चढले. शीखांच्या पवित्र धर्मग्रंथाची अवमानना करणाऱ्यांना सैल सोडले जाऊ नये. त्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा झाला पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. असा कायदा होईपर्यंत आपण टॉवरवरुन खाली उतरणार नाही, अशी घोषणा त्यांनी आधीच केली होती. त्यांचे कुटुंबिय, अन्य नातेवाईक आणि प्रशासन यांच्याकडून त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. तथापि, त्यांनी आपला निर्धार सोडला नाही. त्यांचे कुटुंबिय आणि पंजाब प्रशासनाने त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था टॉवरवरच होईल, अशी सोय केली होती. तरीही, टॉवरवरील लहानशा सज्जात इतका प्रदीर्घ काळ वास्तव्य करणे, ही साधी बाब नव्हती. अखेरीस प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली आहे. त्यानंतर त्यांनी आंदोलन संपविले. ते उतरल्यावर उपस्थितांनी पुष्पवर्षाव करुन आनंद व्यक्त केला. मात्र, त्वरित त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. ते प्रौढ वयाचे आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे हे आंदोलन सर्वत्र चांगल्याच चर्चेत आहे.

Comments are closed.