साय-फाय – स्वीडनचा रिव्हर्स पॅटर्न

>> प्रसाद ताम्हणकर, prasad.tamhankar@gmail.com

गेल्या दशकात जगभरातील शिक्षण क्षेत्रात ‘डिजिटल क्रांती’ नावाचे वारे वेगाने वाहू लागले. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करणे आणि त्यांना ‘स्मार्ट’ बनवण्याच्या नावाखाली शाळाशाळांमध्ये पुस्तकांची जागा टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाइलने घेतली. मात्र ज्या स्कॅन्डिनेव्हियन देशांनी हे ‘डिजिटल मॉडेल’ जगाला सर्वप्रथम शिकवले, त्याचपैकी एक असलेल्या स्वीडनने आता एक धक्कादायक पण डोळे उघडणारा निर्णय घेतला आहे. स्वीडन सरकारने आपल्या शाळांमधून टॅबलेटवर आधारित शिक्षण पद्धती मोडीत काढून पुन्हा एकदा पारंपरिक पाठय़पुस्तके, लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष वाचनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ एका देशाचा धोरणात्मक बदल नसून तो डिजिटल अतिरेकाविरुद्ध पुकारलेले एक युद्ध आहे.

स्वीडनने हा निर्णय घेण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत झालेली घट. ‘प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिटरसी स्टडी’ (PIRLS) च्या अहवालानुसार, 2016 ते 2021 या काळात स्वीडिश मुलांच्या वाचन आणि आकलन क्षमतेत लक्षणीय घसरण झाली आहे. ज्या मुलांचे बालपण क्रीनवर क्रोलिंग करण्यात गेले त्यांना एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे कठीण जाऊ लागले. स्वीडनच्या शिक्षणमंत्री लोटा एडहोम यांनी स्पष्टपणे कबूल केले की, तंत्रज्ञानावरच्या अतिअवलंबनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

क्रीनवर वाचताना मेंदू माहिती स्कॅन करतो, प्रोसेस करत नाही. याउलट हातात पुस्तक घेऊन वाचताना मेंदू शब्दांशी आणि संकल्पनांशी जोडला जातो. डिजिटल माध्यमांमुळे मुलांची एकाग्रता कमालीची घटली आहे आणि आकलन क्षमतेचा ऱहास झाला आहे. टॅबलेटवर टाईप करण्याची सवय झाल्यामुळे मुलांची हाताने लिहिण्याची क्षमता कमी झाली. लेखनामुळे मेंदूच्या ज्या नसा कार्यान्वित होतात, त्या टॅबलेटच्या वापरामुळे सुस्त झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मुलांनी त्यांचे लेखन कौशल्य गमावले आहे. लॅपटॉप किंवा टॅबलेटवर अभ्यास करताना मुले अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया किंवा अनावश्यक माहितीकडे लवकर आकर्षित होतात.

तंत्रज्ञान हे एखाद्या शिक्षकापेक्षा विचलित करणारा घटक (Distraction) अधिक ठरले आणि त्यामुळे मुलांचे विचलित होण्याचे प्रमाण वाढत गेले. सामाजिक आणि मानसिक परिणाम, दुष्परिणामदेखील जाणवू लागले. क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे विकार, झोप न येणे आणि एकटेपणा वाढला. वर्गातील प्रत्यक्ष संवाद कमी होऊन मुले एका आभासी जगात जगू लागली.

स्वीडन सरकार आता बॅक टू बेसिक्स धोरण राबवत आहे. यासाठी त्यांनी तब्बल 500 दशलक्ष क्रोनर (अंदाजे 400 कोटी रुपये) खर्च करून शाळांमध्ये प्रत्येक विषयाची छापील पाठय़पुस्तके अनिवार्य केली आहेत. केवळ वाचनच नाही, तर वर्गातील हस्तलेखन आणि प्रत्यक्ष पुस्तकातून शोध घेऊन उत्तरे लिहिण्याच्या सरावावर त्यांनी भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या हातातून टॅबलेट काढून तिथे पुन्हा कागद आणि शाई देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

स्वीडनचा हा निर्णय जगातील इतर देशांसाठी विशेषत हिंदुस्थानसारख्या देशासाठी वेक अप कॉल आहे. आपण डिजिटल इंडियाच्या प्रवासात अनेकदा शाळांना हायटेक करण्याच्या नादात मूळ शिक्षणाला हरवून बसतो की काय, अशी भीती वाटते. तंत्रज्ञान हे शिक्षणाचे साधन असू शकते, पण ते शिक्षकाची किंवा पुस्तकाची जागा कधीच घेऊ शकत नाही. स्वीडनने हे मान्य केले आहे की, डिजिटल साधनांमुळे मुलांची विचार करण्याची ताकद क्षीण होत आहे. पुस्तके आणि पेन हे केवळ जुन्या काळातले अवशेष नसून ते मानवी बुद्धिमत्तेला धार देणारे आवश्यक पैलू आहेत. जग आता ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जात आहे, तिथे माणसाची नैसर्गिक बुद्धिमत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्याला पुन्हा कागदावर उतरावे लागेल.

तंत्रज्ञानाचा द्वेष करण्याचे कारण नाही, पण त्याचा अतिवापर हा विनाशाचे मूळ आहे. स्वीडनने घेतलेला हा यू-टर्न म्हणजे प्रगतीचा मार्ग बदलणे नसून तो चुकीच्या दिशेने गेलेली पावले मागे घेऊन योग्य वाटेवर येण्याचा प्रयत्न आहे. शाळांमध्ये पुन्हा पुस्तकांचा सुवास दरवळेल आणि पेनाची शाई कागदावर उतरेल तेव्हाच खऱया अर्थाने एक सुजाण पिढी घडेल. जगाने आता हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे की, प्रत्येक स्मार्ट गोष्ट बुद्धिमत्ता वाढवतेच असे नाही.

Comments are closed.