NITI आयोगाच्या उपाध्यक्षांनी पंतप्रधानांची भेट घेतली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीती आयोगाचे नवनियुक्त उपाध्यक्ष डॉ. अशोक लाहिरी यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आपल्या नव्या भूमिकेतील ही त्यांची पहिली अधिकृत बैठक होती. या भेटीवरून सरकार नीती आयोगाचे काम सक्रियपणे पुढे नेत असल्याचे स्पष्ट होते. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर अशोक लाहिरी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
मे 2022 पासून नीती आयोग उपाध्यक्षपदी असलेल्या सुमन बेरी यांच्यानंतर आता त्यांच्या जागी डॉ. अशोक लाहिरी यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. लाहिरी यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही सेवा बजावलेली असून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या जागतिक संस्थांसोबतही काम केले आहे. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आशियाई विकास बँक आणि इतर अनेक अग्रगण्य संस्थांमध्येही सेवा बजावली आहे. लाहिरी हे एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ असून सध्या पश्चिम बंगालमधील बालूरघाटचे भाजप आमदार आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवामुळे ते या पदासाठी एक योग्य उमेदवार असल्याचे मानले जाते. लाहिरी यांची कारकीर्द अत्यंत गौरवशाली राहिली आहे.
Comments are closed.