उष्णतेने संपूर्ण देशात त्याचा रोष पसरवला आहे

राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पारा 43 अंशांच्या पुढे : एप्रिल संपण्यापूर्वीच तीव्र उष्णतेची चाहूल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एप्रिल महिना अजून संपलेलाही नसताना उष्णतेने आपला ‘ट्रेलर’ आधीच सुरू केला आहे. देशभरात तापमान सातत्याने वाढत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह उत्तर भारतातील लोक या भाजून काढणाऱ्या उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवसांसाठी ‘यलो हीटवेव्ह अलर्ट’ जारी केला असून, तापमान 43-44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात अनेक ठिकाणी पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतातील हवामान पूर्णपणे बदलले आहे. पूर्व भारतासाठी पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वायव्य आणि मध्य भारतातील मैदानी प्रदेशात उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या काही दिवसांत हवामान विभागलेले असेल. काही भागांमध्ये पाऊस पडेल, तर इतर भागांमध्ये तीव्र उष्णतेचा अनुभव येईल. याशिवाय, महिन्याच्या अखेरीस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीतील पारा 43 अंश सेल्सिअस

देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत आहे. भारताचा तीन-चतुर्थांश भाग उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. वायव्य, उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील पाच राज्यांमधील 14 शहरांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आहे. यामध्ये वाराणसी, बांदा, रोहतक, झारसुगुडा, टिटलागड, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बारमेर, हमीरपूर, आग्रा आणि राजनांदगाव यांचा समावेश आहे. दरम्यान, दिल्लीत शनिवारी दुपारी तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे राम मनोहर लोहिया रुग्णालयात उष्णताघातासाठी एक युनिट उभारण्यात आले आहे. हा विभाग कूलिंग टब, 200 किलो बर्फ बनवणारी यंत्रे आणि पोर्टेबल आईस पॅकने सुसज्ज ठेवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील 60 जिह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशामधील झारसुगुडा येथे सलग दुसऱ्या दिवशी 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशातील 11 जिह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील तीन जिह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथील तापमान 45.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, महाराष्ट्रातील अकोला येथे पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला, तर अमरावतीमध्ये तो 44.8 अंश सेल्सिअस होता.

तीव्र उष्णतेमुळे राज्य सरकारांचे निर्णय

उत्तर प्रदेश : आग्रा, मथुरा, फिरोजाबाद आणि मैनपुरी येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत मजुरी कामगारांना ‘ब्रेक’

ओडिशा : 18 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर गेल्याने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा बंद.

केरळ : मुख्यमंत्र्यांनी लोकांना सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर न जाण्याचा सल्ला दिला. स्वयं-लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन.

कर्नाटक : सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघात युनिट्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही युनिट्स 31 जुलैपर्यंत कार्यरत राहतील.

मध्य प्रदेश : नर्मदापुरम जिह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अन्यत्रही शाळांच्या वेळेबाबत विचारमंथन करणार.

पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज

26 एप्रिल :

► छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

► आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता.

27 एप्रिल :

► बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्यप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

► हरियाणा, चंदीगड, दिल्ली, ओडिशा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये रात्रीच्यावेळी तापमान अधिक उष्ण राहण्याची शक्यता.

► आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये अत्यंत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता.

Comments are closed.