जप्त माल माणगावऐवजी कोलाड पोलीस ठाण्यात जमा केला; रायगड क्राईम ब्रँच शाखेचे 6 पोलीस निलंबित
रायगड गुन्हे अन्वेषण शाखेतील एका पोलीस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कोलाड येथे कारवाईत जप्त केलेला माल माणगाव पोलीस ठाण्यात जमा करण्याऐवजी कोलाड पोलीस ठाण्यात जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याने ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या तडाख्याने रायगड पोलीस दलातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
माणगावमधील एका बंद कंपनीतील माल चोरीला गेला होता. त्याच दरम्यान १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रोहे तालुक्यातील वरसगाव कंपनीजवळ एक संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी (एम.एच-०३-सी.पी. १६२३) आढळून आली होती. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने ही गाडी जप्त करून नालासोपाऱ्यातील गांगडेपाडा येथील प्रमोदकुमार यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या गाडीत १ लाख रुपये किमतीचे तांबे व स्टील धातूचे तुकडे असा जवळपास दोनशे किलो माल सापडला होता. मात्र नियमानुसार हा सर्व जप्त माल माणगाव पोलीस ठाण्यात जमा करणे गरजेचे असताना कोलाड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याबाबत केलेल्या चौकशीत गैरवर्तन केल्याचे आढळून आल्याने पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह सहा जणांना निलंबित केले.
यांच्यावर कारवाई
निलंबनाची कारवाई केलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार संदीप पहेलकर, पोलीस शिपाई बाबासो पिंगळे, मोरेश्वर ओमले, ओंकार सोंडकर, लालासो वाघमोडे यांचा समावेश आहे. निलंबनादरम्यान या सर्व कर्मचाऱ्यांना दिवसातून दोन वेळा अलिबाग नियंत्रण कक्षात हजेरी लावावी लागणार आहे.
Comments are closed.