Butterfly UTT Auction 2026 : मानव ठक्कर, मानुष शाह, दिया चितळे पूलमध्ये परतले; साथियान, मनिका यांना संघांनी कायम राखले
‘बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस’ (UTT) च्या सातव्या हंगामातील खेळाडूंच्या यादीत भारतीय स्टार मानव ठक्कर, मनुष शाह आणि दिया चितळे, हे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. तसेच, संघांनी आपल्या जुन्या खेळाडूंना कायम ठेवण्याच्या प्रक्रियेअंतर्गत लिलावापूर्वीच दिग्गज खेळाडू साथियान ज्ञानशेखरन आणि मनिका बत्रा यांना संघात कायम राखले आहे. अत्यंत चुरशीचा ठरणारा हा सातवा हंगाम ९ जुलै ते २६ जुलै या कालावधीत गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पार पडेल. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स’ नेटवर्कवर आणि ‘जियोस्टार’ वर लाईव्ह-स्ट्रीमिंगद्वारे उपलब्ध असेल.
आगामी हंगामासाठीच्या खेळाडूंच्या यादीत प्रस्थापित भारतीय खेळाडू, उदयोन्मुख प्रतिभा आणि अव्वल आंतरराष्ट्रीय पॅडलर्स यांचा समावेश आहे. २८ एप्रिल रोजी मुंबईच्या सहारा स्टार येथे होणाऱ्या लिलावात फ्रँचायझी आपापले संघ तयार करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे वर्षभराच्या विश्रांतीनंतर ठक्कर आणि शाह लिलावाच्या यादीत परतले आहेत. ही जोडी सध्या पुरुष दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमितपणे खेळत असते. शाह मिश्र दुहेरीमध्ये चितळेसोबतही खेळतो. ही जोडी जागतिक क्रमवारीत ६ व्या क्रमांकावर असून, डब्ल्यूटीटी फायनल्ससाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे.
मागील हंगामातील लिलावातील सर्वात महागडी खेळाडू असलेली चितळे पुलमध्ये परतली आहे. दबंग दिल्ली टीटीसीने साथियानला कायम ठेवल्यामुळे पुन्हा संघात परतला आहे, ज्यामुळे त्याचा फ्रँचायझीसोबतचा संबंध सलग सातव्या विक्रमी हंगामापर्यंत वाढला आहे. दरम्यान, दुखापतीमुळे मागील हंगाम चुकवल्यानंतर बत्रा, अहमदाबाद एपीएल पायपर्सने कायम ठेवल्यामुळे लीगमध्ये परतली आहे.
लिलावापूर्वी, संघांनी आपले खेळाडू कायम ठेवण्याचे पर्यायही वापरले आहेत. बत्रा आणि ज्ञानसेकरन यांच्यासोबत, अंकुर भट्टाचार्जी आणि दुहेरीतील विशेषज्ञ आकाश पाल यांना अनुक्रमे कोलकाता थंडरब्लेड्स आणि यू मुंबा टीटीने कायम ठेवले आहे. डेम्पो गोवा चॅलेंजर्स आणि पीबीजी पुणे जॅग्वार्स यांनी आपले खेळाडू कायम ठेवण्याचे पर्याय न वापरण्याचा निर्णय घेतला आणि ते नव्याने सामील झालेल्या यूपी प्रोमिथियन्ससोबत पूर्ण रकमेसह लिलावाला सुरुवात करतील.
‘टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (TTFI) अधिपत्याखाली, नीरज बजाज आणि वीटा दानी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या फ्रँचायझी-आधारित लीगमध्ये, संघ पुन्हा एकदा लिलाव पद्धतीद्वारे आपल्या खेळाडूंची निवड करतील; यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला १ कोटी ‘टोकन्स’ची तरतूद करून देण्यात आली आहे.
खेळाडूंच्या उपलब्ध संचाबाबत भाष्य करताना, UTT चे सह-प्रवर्तक नीरज बजाज म्हणाले, “सातव्या हंगामासाठी खेळाडूंचा इतका मजबूत आणि वैविध्यपूर्ण संच पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. मानव, मनुष आणि मनिका यांसारख्या अव्वल भारतीय खेळाडूंचे पुनरागमन आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धात्मक खेळाडूंची उपस्थिती, हे ‘बटरफ्लाय UTT’ शी जोडल्या गेलेल्या टेबल टेनिस खेळाची वाढती खोली आणि गुणवत्ता दर्शवते. अनुभवी नावे आणि नवोदित प्रतिभा यांचा हा मिलाफ आगामी लिलावाला अत्यंत स्पर्धात्मक आणि संपूर्ण हंगामालाच अत्यंत रोमांचक बनवेल.”
या लिलावाचे स्वरूप अत्यंत सुनियोजित असेल; यामध्ये चार गटांमध्ये २० लाख, १२ लाख, ७ लाख आणि ३ लाख टोकन्स आधारभूत किमती निश्चित करण्यात आल्या असून, बोलीतील वाढीव टप्पे २०,००० टोकन्सवर ठरवण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या यादीत, वेल्सची पॅडलर ॲना हर्सीची निवड झाल्यास, ‘बटरफ्लाय UTT’ स्पर्धेत सहभागी होणारी ती आपल्या देशातील पहिलीच खेळाडू ठरेल; तर फ्रान्सची पृथिका पावाडे महिलांच्या गटाची (pool) ताकद आणखी वाढवते. पुरुषांच्या गटात ॲड्रियन रासेनफॉस, एडवर्ड आयोनेस्कू, निकोलस लम आणि युसूफ अब्देलअझीझ यांसारख्या नवीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत पुन्हा सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये बर्नाडेट झोक्स, क्वाड्री अरुना, अल्व्हरो रोब्लेस आणि यांगझी लियू यांचा समावेश असून, ते या लिलावात अनुभव आणि जागतिक दर्जाचा एक अनोखा मिलाफ घेऊन येत आहेत.
भारतीय संघात उदयोन्मुख खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यामध्ये प्रतिभावान दिव्यांशी भौमिक आघाडीवर आहे, जी पहिल्यांदाच लिलावात सहभागी होत आहे. भौमिकने २०२५ च्या आशियाई कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला—३६ वर्षांत असे करणारी ती पहिली भारतीय ठरली—आणि त्यानंतर २०२५ च्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले.
सर्व गटांमध्ये सिद्ध कामगिरी करणारे खेळाडू आणि पुढच्या पिढीतील प्रतिभावान खेळाडू यांच्या संतुलित मिश्रणामुळे, बटरफ्लाय यूटीटी सीझन ७ च्या लिलावात धोरणात्मक लढती अपेक्षित आहेत, कारण संघ आगामी हंगामासाठी एक परिपूर्ण संघ तयार करण्याचा प्रयत्न करतील.
Comments are closed.