भोंदू बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन, रोहित पवार यांची टीका
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ”चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या” असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर व बागेश्वर बाबांवर जोरदार टीका केली आहे.
”चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या, हे भोंदू बागेश्वर बाबाचं वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचंच लक्षण आहे. या मानसिकतेने मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातकी म्हणून हिणवलं असून महिलांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या विचारसरणीतही महिलांना कोणतंही स्थान नाही, हेच स्पष्ट केलं. यासाठीच तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. महिलांना केवळ मुलं जन्माला घालण्याचं मशीन समजून त्यांना चूल आणि मुलापुरतंच मर्यादीत करु पाहणारा हा भोंदू बागेश्वर बाबा एकप्रकारे मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन आहे. राजकीय व्यासपीठावर हा भोंदू असली वक्तव्ये करत असेल तर हेच का यांचं नारीशक्ती वंदन? या भोंदूला एवढीच काळजी आहे तर त्याने मुलं जन्माला घालण्याची सुरुवात स्वतःपासून करावी आणि भाजपा नेत्यांसाठीही हाच सल्ला अनिवार्य करावा. या भोंदूला काही नेते संत म्हणत असतील तर महाराष्ट्राचं याहून मोठं वैचारिक अधःपतन ते कोणतं”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
Comments are closed.