‘एप्रिल हीट’मध्ये शिष्यवृत्तीची ‘अग्नी’परीक्षा! विद्यार्थ्यांसह पालकांचीही तळपत्या उन्हात झुंज, व्यवस्थेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

विदर्भाच्या कडक उन्हात, तापमानाचा पारा ४६ अंशांच्या पार पोहोचलेला असताना, चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना भर दुपारी शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी लागल्याने अक्षरशः ‘अग्नीपरीक्षा’ द्यावी लागल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाले. या परीक्षेत केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही तळपत्या उन्हात तासन्‌तास थांबण्याची वेळ आली.

एकीकडे शासनाकडून एप्रिलमधील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच शाळा घेण्याचे आदेश दिले जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा दुपारी ११ ते १२.३० आणि पुन्हा २ ते ३.३० या वेळेत घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वर्ग ४ साठी १५१ केंद्रांवर १६ हजार ४५३, तर वर्ग ७ साठी ११४ केंद्रांवर १२ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, या कालावधीत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असतो. दोन पेपरांमधील वेळेतही विद्यार्थ्यांना आणि पालकांना सावलीच्या शोधात भटकत रहावे लागले.

अनेक परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, तर काही ठिकाणी पंखे असूनही वीज नव्हती. काही केंद्रांवर पंख्यांचीही व्यवस्था नसल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना घामाघूम अवस्थेत परीक्षा द्यावी लागली. कोवळ्या वयातील या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरली.

“पोटच्या लेकरांना शिक्षणासाठी पाठवलं, पण अशी परीक्षा द्यावी लागेल असं वाटलं नव्हतं,” असे म्हणत काही पालकांच्या डोळ्यांतून संताप आणि असहायतेचे अश्रू दिसून आले. शाळांच्या आवारात झाडांच्या सावलीखाली बसून पालकांनी तासन्‌तास प्रतीक्षा केली.

शासनाच्या अॅडव्हायझरी आणि प्रत्यक्षातील नियोजन यातील विसंगतीमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या तीव्र उष्णतेत परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Comments are closed.