शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, तीन दिवसानंतर बाजार सावरला, गुंतवणूकदारांची 6.77 लाख कोटींची कमाई

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज तेजीचं चित्र पाहायला मिळालं. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टीमधील सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स देखील तेजीसब बंद झाला. आजच्या शेअर बाजारातील तेजीमुळं गुंतवणूकदारांनी एका दिवसात 6 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शेअर बाजार आज : शेअर बाजारात जोरदार तेजी आहे

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्ह दिसत असल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आशियाई बाजारातून मजबूत संकेत मिळाल्यानं गेल्या आठवड्यात शेवटच्या तीन दिवसात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्या घसरणीला आज शेअर बाजारात ब्रेक लागला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या अनिश्चितता कायम असताना इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात दाखल झाल्यानं बाजारात उत्साह दिसून आला.

आयटी, फार्मा, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या निफ्टी निर्देशांकात 2 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅफ स्टॉक्समध्ये जोरदार खरेदीचं चित्र पाहायला मिळालं.सेन्सेक्स आज 639.42 अंकांच्या तेजीसह 77303.63 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांकात 194.75 अंकांची तेजी दिसून आली. यामुळं निफ्टी 50 निर्देशांक 24092.70 अंकांवर बंद झाला.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य वाढण्यामध्ये शेअर बाजारातील तेजीचा हातभार दिसून आला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य आज 6.77 लाख कोटी रुपयांनी वाढलं, म्हणजेच आज दिवसभरात गुंतवणूकदारांनी 6.77 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

24 एप्रिल 2026 ला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 461 लाख कोटी रुपये होते. त्यामध्ये 6.77 लाख कोटी रुपयांची वाढ होऊन ते 677 लाख कोटींवर पोहोचलं आहे. सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या टॉप 30 कंपन्यांच्या शेअरपैकी 23 शेअर तेजीसह बंद झाले. आज सर्वाधिक तेजी सन फर्मा कंपनीच्या शेअरमध्ये तर सर्वाधिक घसरण एक्सिस बँक, बीईएल आणि ट्रेंटच्या शेअरमध्ये दिसून आली.

बीएसईवर आज 4556 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं, यापैकी 3075 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 1288 शेअरमध्ये घसरण झाली. 193 शेअरमध्ये कोणताच बदल झाला नाही तर, 171 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि 43 शेअरनं 52 आठवड्यांचा निच्चांक गाठला.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.