आधीच विवाहित अन् पदरी पोरंबाळं, गुजरातच्या नवरीने मंगळवेढ्याच्या नवऱ्याला लाखोंना फसवलं

सोलापूर : मंगळवेढ्यात एक धक्कादायक विवाह फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील एका नवरीने खोटं ओळख सांगून आणि आधीच लग्न झालेलं असताना दुसऱ्यांदा विवाह करून नवरदेवाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नवरी कुसुमबेन घाटाड, तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख आणि अल्पवयीन भाऊ यांच्यासह एजंट असलेल्या सुरेखा सूर्यवंशी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नवरी आणि एजंट विरोधात दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील नवरीचा यापूर्वीच विवाह झाला होता आणि तिला मुलेही आहेत. असं असतानाही तिने मंगळवेढ्याच्या या नवरदेवाला फसविलं आहे.

गुजरातमधील ही नवरी मुस्लिम समाजाची असून विवाह करताना तिने आपण मराठा समाजातील असल्याचं सांगितलं होतं.  आता पोलिसांनी या नवरीसह एजंटाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या नवरीसोबत तिची आई, बहीण आणि भावावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

Mangalwedha Marriage Drama : नेमका काय आहे प्रकार?

मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील एका 37 वर्षीय शेतकरी नवरदेवाचे लवकर लग्न जमत नव्हते म्हणून तो नवरीच्या शोधात होता. यावेळी एजंटाने हे सावज हेरले आणि  या नवऱ्या मुलाला 15 एप्रिलला उदगीर येथे बोलावले. नवरदेव दुपारी चार वाजता तिथे पोहोचल्यावर रात्री आठ वाजेपर्यंत त्याला वाट पाहायला लावली.

यानंतर त्या एजंटने त्या व्यक्तीला मुलगी दाखवली. मुलगी पसंत पडल्यावर उदगीर येथील एका गणपतीच्या मंदिरात रात्री 11 वाजता हार घालून त्यांचे लग्न लावून दिले. यानंतर नवरदेव आणि नवरी कुटुंबासह गावाकडे पोहोचले. त्या दोघांचे गावाकडे 19 एप्रिल रोजी थाटामाटात लग्न लावण्यात आले, अक्षताही झाल्या अन् देव दर्शनही झालं.

Solapur Fraud Marriage : मुलगी पळून गेली

नंतर 23 एप्रिल रोजी पहाटे या नवरदेवाच्या घराजवळ एक चार चाकी गाडी येऊन थांबली. पहाटे सहा वाजता कोणालाही सांगता ही नवरी त्या गाडीत जाऊन बसली आणि गाडी निघूनही गेली. मात्र ही घटना शेजाऱ्याने पाहिल्यानंतर तातडीने या नवरदेवाला याची कल्पना दिली. त्यानंतर या गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवण्यात आली.

आपण फसलो गेलेलो आहे याची जाणीव झाल्यावर नवरदेवाने थेट पोलिसांना पाचारण करून या गाडीसह पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गाडीतील मुलीची आई, मुलीची बहीण आणि भाऊ अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Solapur Fake Bride Scam : एजंटने 2.70 लाख उकळले

दरम्यान, विवाह लावून देतो म्हणून या प्रकरणातील उदगीरची महिला एजंट सुरेखा सूर्यवंशी हिने नवरदेवाकडून तब्बल दोन लाख 70 हजार रुपये उकळले होते. पोलिसांनी या महिला एजंटलाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.  या सर्वांना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यावेळी पोलिसांनी या सर्व प्रकाराची चौकशी सुरू केल्यावर यातील नवरी मुलगी ही मूळची उदगीर येथीलच असल्याची माहिती समोर आली. तिचा विवाह गुजरातमध्ये झाला होता. तिला एक मुलगा असून तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती त्या महिलेने सांगितली.

या एजंटकडून अशा अजून किती लग्नाळू नवरदेवांची फसवणूक झाली आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सध्या या प्रकरणात नवरी कुसुमबेन घाटाड, तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख आणि अल्पवयीन भाऊ यांची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचा प्रश्न सामाजिक बनला आहे. घटलेली मुलींची संख्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा याचा फायदा असे एजंट आणि पैशासाठी लग्नाचे नाटक करणाऱ्या मुली उठवताना दिसत आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.