मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान, भाऊ-बहिणीचा आईसाठी प्रचार, गावकऱ्यांना अश्रू अनावर
बीड : मस्साजोग गावच्या सरपंचपदासाठी (Massajog Sarpanch Election) मंगळवारी निवडणूक होणार असून त्यासाठी प्रचाराची सांगता झाली. या वेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी मतदारांसमोर जात मतदानासाठी आवाहन केलं. त्याचवेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी (Vaibhavi Deshmukh) आणि मुलगा विराज देशमुखने आपल्या आईसाठी प्रचार केला. मात्र त्यावेळी गावकरी भावुक झाले अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसून आलं.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) आणि मागील निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख या दोघांमध्ये सरपंचपदाची थेट लढत होत आहे.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपल्या वडिलांच्या न्यायाची लढाई लढणाऱ्या वैभवी देशमुख हिने भाऊ विराज देशमुख याच्यासोबत आई अश्विनी देशमुख यांच्यासाठी प्रचार केला. याच प्रचारादरम्यान गावकरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. असून गावकऱ्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले आहे.
Massajog Sarpanch Election : बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ
मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर, मागील सरपंचपदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत होणारे स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, आता, मस्साजोगचा सरपंच कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Walmik Karad News : वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या बगलबच्चांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जातीय का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बीड कारागृहातील एका कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. सनी आठवले नावाच्या बीडमधील कुख्यात गुंडाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
सनी आठवलेच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र कैदी अझहर पठाणला वाल्मिक कराड गँगनं खरोखर मारहाण केल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या सेवेत गुंतलं आहे असा आरोप या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. कराडला सिम कार्ड, पैसे, डिश टीव्ही या गोष्टी कशा काय मिळतात असा प्रश्नही सनी आठवलेनं विचारला. त्याआधी अझहर पठाण या कैद्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंही कराड गँगकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यानं या कॉल रेकॉर्डिंच्या माध्यमातून केली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.