राघव चढ्ढा यांच्यासह बंडखोर आपचे खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पार्टी (आप) मधून राजीनामा दिलेल्या राघव चड्ढांसह सर्व सात खासदारांनी सोमवार, 27 एप्रिल रोजी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. या सात खासदारांच्या समावेशामुळे राज्यसभेत भाजपचे संख्याबळ मजबूत झाले आहे. तसेच राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 148 झाले आहे. दरम्यान, राज्यसभेत 10 खासदार असलेल्या ‘आप’चे आता केवळ तीन खासदार उरले आहेत. राज्यसभा सचिवालयाने सोमवारी सर्व बंडखोर ‘आप’ खासदारांच्या भारतीय जनता पार्टीमधील विलीनीकरणाला मंजुरी देणारी अधिसूचना जारी केली आहे.

राज्यसभा अध्यक्षांनी राघव चड्ढा यांच्यासह सात राज्यसभा खासदारांना आम आदमी पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होण्यास मंजुरी दिली आहे. या बदलानंतर राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ 106 वरून 113 झाले आहे, तर आम आदमी पार्टीचे संख्याबळ 10 वरून 3 पर्यंत कमी झाले आहे. आता वरिष्ठ सभागृहात आम आदमी पार्टीचे संजय सिंह, एन. डी. गुप्ता आणि बलबीर सिंग सीचेवाल हे केवळ तीन खासदार उरले आहेत.

राज्यसभा सचिवालयाने अधिसूचना जारी केली

सर्व बंडखोर ‘आप’ खासदारांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभा सचिवालयाने यासंदर्भात एक अधिसूचना देखील जारी केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी आम आदमी पक्षाच्या सात खासदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण मान्य केले आहे. आता राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंग साहनी हे भाजप संसदीय पक्षाचे सदस्य असतील, असे रिजिजू यांनी जाहीर केले.

‘आप’ची मागणी फेटाळली

दरम्यान, आम आदमी पक्षाने राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या सर्व सात राज्यसभा खासदारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. ‘आप’चे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली होती. मात्र, अध्यक्ष महोदयांनी ‘आप’ची मागणी फेटाळून लावल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

राघव चड्ढा यांनी मांडली ‘आपबीती’

राघव चड्ढा यांनी सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये चड्ढा म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना असंख्य संदेश येत आहेत. बहुतेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत, तर काहींना त्यांच्या या मोठ्या निर्णयामागील कारणे जाणून घ्यायची आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण करिअरसाठी कधीही राजकारणात आलेलो नाही; उलट, ते आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य बनले आणि त्यांनी आपल्या तारुण्यातील 15 वर्षे त्या पक्षाला समर्पित केली. मात्र, आता तो पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही, असा आरोप चड्ढा यांनी केला. आज आम आदमी पक्षात एक विषारी वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना तिथे काम करण्यापासून रोखले जात आहे. संसदेत बोलण्यापासूनही रोखले जात आहे. संपूर्ण पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या व्यक्तींच्या हातात अडकला आहे, अशी ‘आपबीती’ त्यांनी मांडली आहे.

Comments are closed.