राज्य प्रशासनात फेरबदलाची चिन्हे, विकासचंद्र रस्तोगी होणार वित्त विभागाचे सचिव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. गृहनिर्माण, जलसंपदा विभागाला लवकरच नवे सचिव मिळणार आहेत. तर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांच्या जागी विकासचंद्र रस्तोगी यांची वर्णी लावली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत प्रशासनातील खांदेपालटावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्यास या वयोमानानुसार येत्या 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनात मोठय़ा प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱयांच्या पाठोपाठ आता मंत्रालयातील सनदी अधिकाऱयांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

विकासचंद्र रस्तोगी यांची अलीकडेच कृषी विभागातून वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) बदली करण्यात आली. ओ.पी. गुप्ता हे याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी गुप्ता यांना हलवून त्यांच्या जागी रस्तोगी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.