Chandrapur News – मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 3 रुग्णांची दृष्टी गेली, ब्रह्मपुरीतील हॉस्पिटल सील
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांची दृष्टी गेल्याने ब्रह्मपुरी शहरातील नामांकित ख्रिस्तानंद हॉस्पिटल सिल करण्यात आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांना गंभीर जंतूसंसर्ग होऊन तब्बल तीन रुग्णांची दृष्टी गेल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे प्राप्त झाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीच्या अहवालानंतर आरोग्य प्रशासनाने हॉस्पिटलवर कारवाई केली.
प्राथमिक तपासणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ चे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या नियमांचाही भंग झाल्याचेही दिसून आले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाची नोंदणी तत्काळ रद्द करत ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील केले.
ख्रिस्तानंद मिशनरीतर्फे चालणाऱ्या या रुग्णालयात अल्पदरात सेवा मिळत असल्याने रुग्णांची मोठी गर्दी असते. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Comments are closed.