मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्

पश्चिम बंगाल निवडणूक 2026: पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. निवडणूक आयोगाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चक्क उत्तर प्रदेशचे ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ आयपीएस अजय पाल शर्मा (IPS Ajay Pal Sharma) यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बंगालमध्ये पाऊल ठेवताच शर्मा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उमेदवार जहांगीर खान (Jahangir Khan) यांना कडक शब्दांत इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

West Bengal Election 2026: ‘सिंघम’चा थेट इशारा आणि व्हिडिओ व्हायरल

दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी दक्षिण 24 परगना जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. टीएमसी उमेदवार जहांगीर खान मतदारांना धमकावत असल्याच्या तक्रारी अजय पाल शर्मा यांच्याकडे आल्या होत्या. यानंतर शर्मा यांनी एसएसबी आणि क्यूआरटी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जहांगीर खान यांना समोर उभे करून शर्मा यांनी थेट इशारा दिला की, “जनतेकडून धमक्यांच्या तक्रारी येत आहेत. जर पुन्हा अशी खबर आली, तर ‘अच्छे से खबर लेंगे’… नंतर रडत बसू नका किंवा पश्चात्ताप करू नका.” या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक 2026: महुआ मोईत्रांचे साडेतोद उत्तर

अजय पाल शर्मा यांच्या या व्हिडीओवर तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक नेत्या महुआ मोइत्रा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत खोचक टीका केली आहे. महुआ यांनी शर्मांना उद्देशून म्हटले की, माझे ‘फेअर अँड लव्हली’ डार्लिंग डॉ. आयपीएस अजय पाल. आम्ही अशा प्रकारचे लोक आहोत ज्यांना तुमच्या ‘छोटा फँटा’ आणि ‘बडा फँटा’ या दोघांशीही योग्य प्रकारे कसे निपटायचे, हे चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे, तुमची हिरोगिरी जरा कमीच ठेवा, अशी टीका त्यांनी केलीय.

West Bengal Election 2026: आयोगाला इथे एन्काउंटर करायचे आहेत का?

दरम्यान, 29 एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांसाठी निवडणूक आयोगाने 11 नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अजय पाल शर्मा यांचे नाव अग्रस्थानी आहे. यूपीमध्ये डझनावारी एन्काउंटर करणारे आणि गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे शर्मा बंगालमध्ये आल्याने टीएमसीने संताप व्यक्त केला आहे. “आयोगाला इथे एन्काउंटर करायचे आहेत का?” असा सवाल टीएमसी नेत्यांनी उपस्थित केला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात अजय पाल शर्मा यांच्या नियुक्तीमुळे टीएमसीच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, आता 29 एप्रिलच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Who is Ajay Pal Sharma: कोण आहेत आयपीएस अजय पाल शर्मा?

आयपीएस अजय पाल शर्मा हे उत्तर प्रदेशमधील ‘सुपर कॉप’ आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बद्दल असे म्हटले जाते की ते ज्या ठिकाणी नियुक्त होतात, तिथे गुन्हेगार स्वतःहून जामीन रद्द करून तुरुंगात परत जातात. अजय पाल शर्मा यांची गणना उत्तर प्रदेश पोलिस दलातील धडाडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये होते. विविध जिल्ह्यांमध्ये सेवेत असताना त्यांनी डझनभर एनकाउंटर केले असून, अनेक धोकादायक गुन्हेगारांना तुरुंगात डांबले आहे.

त्यांच्या फिटनेसकडे असलेले लक्ष आणि गुन्हेगारीविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेमुळे त्यांना यूपी पोलिसांचा ‘सिंघम’ असेही म्हटले जाते. मुळचे पंजाबमधील लुधियाना येथील असलेले अजय पाल शर्मा हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते प्रयागराज येथे जॉइंट सीपी पदावर कार्यरत आहेत. शामली, नोएडा, जौनपूर आणि रामपूर येथे नियुक्ती दरम्यान त्यांच्या एनकाउंटर कारवाया आणि गुन्हेगारांवरील कडक अ‍ॅक्शनची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे.

आणखी वाचा

High Court : अरविंद केजरीवालांसाठी खुशखबर, हायकोर्टाकडून ‘आप’संदर्भात मोठा निर्णय, केजरीवाल म्हणाले, स्वागत…

आणखी वाचा

Comments are closed.