इराणकडून ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा वापर ‘आर्थिक अण्वस्त्रा’सारखा; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचा आरोप

इराण आणि अमेरिका यांच्यातील यांच्यात शांतता करारासाठीचा मार्ग अजूनही सूकर झालेला नाही. दोन्ही देश आपापल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. असे असताना, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. तसेच इराणच्या आक्रमक धोरणांवर सडकून टीका केली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर जगाविरुद्ध ‘आर्थिक अण्वस्त्र’ म्हणून केल्याचा जात असल्याचे रुबियो यांनी म्हटले आहे.

इराण आपल्या भौगोलिक स्थानाचा वापर करून जगातील 25 टक्के ऊर्जा पुरवठा धोक्यात आणण्याची बढाई मारत असल्याचे मार्क रुबियो यांनी म्हटले आहे. तेहरानमध्ये लावण्यात आलेल्या फलकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जर इराणकडे अणुबॉम्ब असता, तर त्यांनी संपूर्ण जगाला ओलीस ठेवले असते. इराणसोबतच्या कोणत्याही नवीन करारामध्ये त्यांच्या अणुकार्यक्रमावर कडक निर्बंध घालणारी कलमे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

मार्को रुबियो यांच्या मते, इराण हा केवळ एक कडवट विचारांचा देश नसून तो आपल्या विचारधारेच्या जोरावर इतर देशांवर दबाव आणू पाहात आहे. त्यांनी लेबनॉनमधील हिजबुल्ला, हमास आणि इराकमधील शिया सशस्त्र गटांशी असलेल्या इराणच्या संबंधांवर बोट ठेवले. जर इराण अण्वस्त्रांनी सज्ज झाला, तर या दहशतवादी गटांविरुद्ध कोणतीही कारवाई करणे कठीण होईल, कारण इराण अण्वस्त्रांच्या धाकाने जगाला रोखून धरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. इराणला केवळ स्वतःच्या अस्तित्व, तर संपूर्ण मध्य-पूर्वेवर वर्चस्व गाजवायचे असून अणुबॉम्बच्या मदतीने हे लक्ष्य गाठण्याचा त्यांचा मानस असल्याचे रुबियो म्हणाले.

इराणमधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रुबियो यांनी मोजतबा खामेनी यांचा उल्लेख केला. अद्याप ज्यांची विश्वासार्हता सिद्ध झालेली नाही आणि जे सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत, अशा नेत्यांच्या हाती सत्ता असणे संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. इराण सध्या वाटाघाटींबाबत गंभीर नसून, देशातील अंतर्गत अशांततेमुळे आणि आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी ते केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याबाबत आणि युद्ध संपवण्याबाबत इराणने दिलेल्या नवीन प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्याचे वृत्त आहे. इराणने सुरुवातीला नाकेबंदी उठवण्याची मागणी केली होती आणि अणुकार्यक्रमावर नंतर चर्चा करण्याचे सुचवले होते, जे अमेरिकेला मान्य नाही. रुबियो यांनी शेवटी इशारा दिला की, जर हा करार झाला नाही, तर ट्रम्प पुढील कठोर पावले उचलतील. इराणच्या धोक्याकडे जगाने डोळे उघडून पाहण्याची वेळ आली असून, त्यांना तेलाप्रमाणेच अण्वस्त्रांच्या जोरावर जगाला वेठीस धरू दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.