हिंदुस्थानात सूर्य कोपला तर चीनमध्ये पूरपरिस्थती, जागतिक हवामान बदलाचा आशियाई देशांना फटका

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये दोन प्रमुख आशियाई देशांमधील हवामानात तीव्र विरोधाभास दिसून येत आहे. हिंदुस्थानामध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले आहे. दरम्यान, चीनच्या ग्वांग्शी प्रांतातील किनझोऊ शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते, वाहने आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे चीनमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. २७ एप्रिलला चीनमध्ये केवळ ८ तासांत २७३ मिमी पाऊस पडला. त्यापैकी १६० मिमी पाऊस एकाच तासात पडला. एप्रिल महिन्यातील हा एक विक्रम मोडणारा पाऊस होता.

सध्या हिंदुस्थानमध्ये उत्तर, मध्य आणि पश्चिम भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भ यांसारख्या भागांमध्ये दिवसाचे तापमान ४२ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. रात्रीसुद्धा उकाडा वाढला आहे. लोक त्रस्त झाले आहे. हिंदुस्थानच्या हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे.

दुसरीकडे, चीनच्या दक्षिणेकडील ग्वांग्शी प्रांतात २७ एप्रिलच्या सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. किनझोऊ शहरात ८ तासांत २७३ मिमी पावसाची नोंद झाली. एकाच तासात १६० मिमी पाऊस पडल्याने शहराच्या सखल भागांमध्ये पूर आला. रस्त्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाहने पाण्यात बुडाली होती, शाळा बंद कराव्या लागल्या आणि स्थानिक प्रशासनाने पाणी उपसण्यासाठी व लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके पाठवली. सुदैवाने कोणत्याही मालमत्तेचे यामध्ये नुकसान झाले नाही.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानातील वाढत्या उष्णतेमागे अनेक कारणे आहेत. पश्चिमी वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे, पाऊस आणि थंड वारे येण्यास प्रतिबंध होत आहे. थर वाळवंट, हिमालयाची भिंत आणि शहरी भागातील काँक्रीटमुळे येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे उष्णता अधिक वाढत आहे. हवामान बदलामुळेही बऱ्याच काळापासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. चीनमध्ये मुसळधार पावसाचे मुख्य कारण म्हणजे तीव्र उष्णतेमुळे वातावरणातील वाढलेली आर्द्रता हे आहे. गरम हवा जास्त पाणी (वाफ) शोषून घेऊ शकते. जेव्हा ही आर्द्रता अचानक पावसाच्या रूपात पडते, तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. ग्वांग्शीसारख्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे. हिंद महासागरात वेगाने होणाऱ्या तापमानवाढीमुळे दक्षिण चीनमध्ये आर्द्रता आणि पावसाचे प्रमाणही वाढत आहे.

आशिया हा एक विशाल खंड आहे. वेगवेगळ्या प्रदेशांची भौगोलिक स्थाने, समुद्रापासूनचे अंतर, पर्वत आणि वाऱ्याची दिशा वेगवेगळी असते. हिंदुस्थान प्रामुख्याने उष्णकटिबंधीय क्षेत्रात येतो, जिथे उष्णता लवकर वाढते. दक्षिण चीन, जसे की ग्वांग्शी, समुद्राच्या जवळ आहे, जिथे आर्द्रता सहज पोहोचते. यामागील वैज्ञानिक कारण प्रामुख्याने हवामान बदल आहे. जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात अधिक आर्द्रता साठते. यामुळे दुष्काळ असलेल्या भागात उष्णता वाढते आणि जास्त पाऊस असलेल्या भागात मुसळधार पाऊस पडतो. याला तीव्र हवामान बदल म्हणतात. एल निनोसारख्या घटनांमुळेही हवामानात बदल होतो. यामुळे काही भागात उष्णता आणि दुष्काळ तर इतर भागात पूर येतो.

हिंदुस्थान उष्णतेशी आणि चीन पुराशी झुंज देत आहे. यावरून हवामान बदलाचा परिणाम आशियावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येत आहे. अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आता दोन्ही देशांनी उत्तम पूर्वतयारी, शहरी नियोजन, वृक्षारोपण आणि जल व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. भविष्यात अशा टोकाच्या हवामान घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

Comments are closed.