“शॉर्ट-पिच बॉलवरील कामगिरीच्या टीकांमुळे बॅटींग सुधारली”, श्रेयस अय्यरने उघड केले त्याच्या तुफानी फलंदाजीचे रहस्य
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल २०२६ मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याची नेतृत्वाबरोबर फलंदाजीही अप्रतिम ठरत आहे, विशेष करून मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना. त्याच्या फलंदाजीत इतके बदल का आले, याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
श्रेयसवर शॉर्ट-पिच चेंडूविरुद्धच्या त्याच्या संघर्षावरून सतत टीका होत होती आणि हेच त्याच्या आयपीएल २०२६ च्या हंगामातील अप्रतिम फलंदाजीमागचे कारण आहे, हे त्याने स्पष्ट केले आहे. जियोस्टारवर बोलताना त्याने मान्य केले की, शॉर्ट-बॉल विरुद्धच्या कामगिरीबद्दल लोकांच्या टीकांमुळे त्याच्या मानसिकतेत आणि तयारीमध्ये बदल झाला.
श्रेयस म्हणाला, लोक म्हणायचे की मी माझी शॉर्ट-बॉलची समस्या कधीच सोडवू शकणार नाही. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. चांगली कामगिरी करून मला त्यांना चुकीचे सिद्ध करायचे होते, म्हणून मी त्यावर प्रचंड मेहनत घेतली.
“शॉर्ट-पिच गोलंदाजीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन आता पूर्णपणे बदलला आहे. आधी मी केवळ एकच धाव घेत होतो किंवा चेंडू खाली टोलवण्याचा प्रयत्न करायचो. आता माझी मानसिकता बदलली असून मला शॉर्ट बॉल दिसला की मी त्यावर षटकार मारणारच,” असेही श्रेयसने पुढे म्हटले आहे.
श्रेयसची वादळी फलंदाजी नुकतीच दिसली. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २६५ धावांचा यशस्वी पाठलाग करताना ३६ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या होत्या. या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग ठरला.
श्रेयसने त्याच्या फलंदाजीत सुधारणा आणण्यासाठी मदत केल्याबद्दल प्रवीण आमरे आणि अभिषेक नायर यांचे आभार मानत त्यांना श्रेय दिले. “फलंदाजीच्या सरावावेळी मी सुमारे ५० षटके खेळण्याचा आणि ३०० पेक्षा अधिक चेंडूंचा सामना करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्यासाठी योग्य काय हे समजायला मदत होते. केवळ थ्रोडाउन्सवर अवलंबून राहण्याऐवजी प्रत्यक्ष गोलंदाजांचा सामना केल्यामुळे गोलंदाजीतील स्पष्टता सुधारही,” असेही श्रेयसने म्हटले आहे.
Comments are closed.