पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होत आहे

द्वितीय आणि अंतिम टप्प्याची साऱ्यांना उत्सुकता

वृत्तसंस्था / कोलकाता

गेले दोन महिने गाजत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत द्वितीय आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज बुधवारी होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता प्रारंभ होत असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात साधारणत: 3 कोटी 21 लाख मतदार असून त्यांच्यासाठी 41 हजारहून अधिक मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या टप्प्यात 142 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून या मतदानासमवेतच चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यातील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. मतगणना येत्या सोमवारी (4 मे या दिवशी) होणार असून त्याच दिवशी ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट होणार आहे. विशेषत: पश्चिम बंगाल या राज्याकडे साऱ्या देशाचेच लक्ष आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रथम टप्प्याचे मतदान 23 एप्रिलला पार पडले आहे. त्याच दिवशी तामिळनाडू राज्याच्या सर्व 234 मतदारसंघांमध्येही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याआधी 9 एप्रिलला आसाम आणि केरळ ही राज्ये, तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. या सर्व प्रदेशांमध्ये एकंदर 824 विधनासभा स्थाने आहेत. तसेच काही राज्यांमध्ये काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मध्यावधी निवडणुकांचे मतदान झाले आहे. या सर्व मतदारसंघांची मतगणना येत्या सोमवारी केली जाईल. यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे.

पश्चिम बंगालमध्ये कडेकोट सुरक्षा

पश्चिम बंगाल राज्याला निवडणूक हिंसाचाराची मोठी परंपरा आहे. ती मोडण्यासाठी यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मतदानाच्या प्रथम टप्प्यातही कठोर सुरक्षेव्यवस्थेमुळे हिंसाचार रोखण्यात यश आले होते. काही तुरळक घटनांचा अपवाद सोडल्यास शांततेत मतदान पार पडले होते. हिंसाचाराची शक्यता या द्वितीय टप्प्यात सर्वाधिक असल्याने अधिक कडक सुरक्षा ठेवण्यात येत आहे. केंद्रीय सुरक्षा दलांचे अडीच लाखांहून अधिक सुरक्षा सैनिक द्वितीय टप्प्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच स्थानिक पोलिसांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा आदेश आहे.

1 हजार 600 जण स्थानबद्ध

दंगा घडविण्याचा इतिहास असणाऱ्या 1 हजार 600 हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच या टप्प्याचा जाहीर प्रचार संपल्यापासून मतदान संपेपर्यंच्या 48 तासांच्या कालावधीत दुचाकी मिरवणुकांवर आणि समूहाने दुचाकी प्रवास करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला तृणमूल काँग्रेसने कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाच्या एकल खंडपीठाने ही बंदी 48 तासांच्या स्थानी 12 तासांची करण्याचा आदेश दिला होता. तथापि, केंद्रीय निवडणूक आयोगाने या आदेशाला द्विसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. द्विसदस्यीय खंडपीठाने एकल खंडपीठाचा आदेश रद्द करुन केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला आदेशच लागू ठेवला आहे. त्यामुळे दुचाकी मिरवणुका आणि रात्री दुचाकी प्रवास यांच्यावरील बंदी आज बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत लागू राहील, असे दिसत आहे.

महत्वाचे संघर्ष

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून संघर्षात असून त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघातील संघर्ष सर्वाधिक आकर्षणाचा बिंदू आहे. याखेरीज राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री रणभूमीत असून त्यांच्याही भवितव्याचा निर्णय या टप्प्यात मतदार करणार आहेत. प्रथम टप्प्यातील 152 मतदारसंघांमध्ये 93.19 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. आता द्वितीय टप्प्यात किती प्रतिशत मतदान होते, हा देखील सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोठ्या औत्सुक्याचा विषय आहे.

‘एक्झिट पोल’ आजच संध्याकाळी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक्झिट पोलचे निष्कर्ष आज बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर प्रसारित केले जातील. त्यांच्यावरुन ही चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुकांचे परिणाम साधारण कसे असतील याचे अनुमान काढता येणार आहे. तथापि, एक्झिट पोलचे निष्कर्षही चुकीचे ठरतात, असे अनेकदा दिसून आल्याने खऱ्या परिणामांसाठी 4 मे या दिवसाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले.

द्वितीय टप्पा आकडेवारीत…

एकंदर जागा : 142

मतदार : 3 कोटी 21 लाखांहून अधिक

मतदान केंद्रे : 41 हजारांहून अधिक

सुरक्षा सैनिक : 2 लाख 50 हजारांहून अधिक

 

 

Comments are closed.