सलीम डोलाला पकडण्यात यश

दाऊद इब्राहिमचा अंमली पदार्थ व्यापार सहकारी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दाऊद इब्राहिम या परागंदा दहशतवाद्याचा सहकारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायाचा मुख्य सूत्रधार सलीम डोला यास भारतात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तुर्कियेहून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. काही काळापूर्वी भारतात हस्तगत करण्यात आलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या संदर्भात तो भारतीय अन्वेषण यंत्रणांना हवा होता. गेल्या शनिवारी त्याला तुर्किये या देशात भारताने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही लागू करण्यात आली होती.

मंगळवारी सकाळी त्याला तुर्कियेहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्याचा ताबा एनआयएकडे देण्यात आला. त्याचे प्रत्यार्पण आणि अटक हा भारतात आणि जगभरात असलेल्या अंमली पदार्थ सिंडिकेटला मोठा धक्का मानला जात आहे. आता त्याच्यावर भारतात कायदेशीर कारवाई केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची माहिती दिली. तरुण पिढीला बिघडविणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला भारतात कोणतेही स्थान असणार नाही. हे व्यवहार करणारे कोठेही असले आणि कितीही मोठे असले, तरी त्यांना भारतात खेचून आणले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी मंगळवारी केली.

भारत सरकारचे धोरण कठोर

अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्री यांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर धोरण स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्यापार आणि तो करणारे गुन्हेगार यांना निर्दयपणे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भारताची कार्यवाही होत आहे. अंमली पदार्थांच्या टोळ्या संपविल्या जात असून कोणत्याही परिस्थितीत यांना डोके वर काढू दिले जाणार नाही. भारताच्या अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी आता केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही आपली पाळेमुळे घट्ट केली असून हे टोळीवाले जगात कोठेही असले तरी त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही शाह यांनी दिली आहे.

सलीम डोला हा कोण…

सलीम डोला हा दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गुन्हेगारी सिंडिकेटचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो कृत्रिम अंमली पदार्थांच्या व्यापाराचा प्रमुख सूत्रधार मानला जातो. त्याचे अंमली पदार्थ जाळे अनेक देशांमध्ये पसरले आहे. त्याचे मुख्य स्थान संयुक्त अरब अमिरात हे आहे. त्याने या अवैध व्यापारातून गेल्या दोन वर्षांमध्ये किमान 200 कोटी रुपयांची प्राप्ती केली आहे, असा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरात आणि महाराष्ट्रात हेरॉईन, चरस, मेफेड्रोन, मँड्रेक्स आणि मेथँफेटामाईन अशा प्रकारच्या अंमली पदार्थांचे अनेक साठे अंमली पदार्थ विरोधी यंत्रणानी धाडी टाकून हस्तगत पेले होते. त्यावेळी काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीत या सूत्रधाराचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो भारतातील अन्वेषण यंत्रणांना हवा होता. त्याचे अंमली पदार्थांचे जाळे मध्यपूर्व, आफ्रिका आणि युरोप खंडात पसरले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा मुलगा ताहिल सलीम डोला याचेही प्रत्यार्पण संयुक्त अरब अमिरातीकडून करण्यात आले होते. तो सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.

अंमली पदार्थ सिंडिकेटला धक्का

ड सलीम डोला याच्या प्रत्यार्पण-अटकेमुळे अंमली पदार्थ सिंडकेटला हादरा

ड सलीम डोला याचे अंमली पदार्थ जाळे अनेक खंडामध्ये, तसेच देशांमध्ये

ड भारताच्या अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार त्याचे प्रत्यार्पण

ड भारतातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापार नष्ट करण्याचे सरकारचे ध्येय

Comments are closed.