गुजरातमध्ये भाजपचा मोठा विजय

जिंकल्या सर्व महानगरपालिका, विरोधकांचा धुव्वा

वृत्तसंस्था / गांधीनगर

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड विजय प्राप्त झाला आहे. या पक्षाने राज्यातील सर्व 15 महानगरपालिकांमध्ये मोठे बहुमत प्राप्त केले. तसेच जिल्हा पंचायती आणि तालुका पंचायतींच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या या कामगिरीसाठी कार्यकर्त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे कौतुक केले आहे.

या निवडणुकांमध्ये काँगेस आणि आम आदमी या प्रमुख पक्षांनी भाग घेतला होता. तथापि, त्यांचा धुव्वा उडाला. आम आदमी पक्षाला केवळ एका तालुका पंचायत निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. काँग्रेची स्थिती आम आदमी पक्षाच्या तुलनेत बरी असली तरी तो पक्ष भारतीय जनता पक्षाच्या खूपच मागे पडल्याचे दिसून येत आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीच्या आधी हे यश मिळाल्याने पक्ष अधिक बळकट झाला.

अहमदाबादमध्ये मोठे यश

अहमदाबाद या राज्यातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने एकंदर 192 प्रभागांपैकी 158 प्रभागांमध्ये यश मिळविले. काँग्रेसला केवळ 22 जागा मिळाल्या आहेत. अहमदाबाद महानगरपालिका या पक्षाने सलग आठवेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. इतर अनेक महानगरपालिकांमध्येही भारतीय जनता पक्षाने दोन तृतियांश बहुमत मिळविल्याचे दिसून येत आहे. राज्यातील 84 नगरपालिकांच्या एकंदर 2,030 प्रभागांपैकी भारतीय जनता पक्षाने 1 हजार 791 प्रभाग जिंकत आतापर्यंत 80 नगरपालिकांमध्ये बहुमत मिळविले आहे. तसेच जिल्हा पंचायतींमध्येही 34 पैकी 28 मध्ये बहुमत मिळविले आहे.

तालुका पंचायतींमध्येही प्रसिद्धी

राज्यातील 260 तालुका पंचायतींपैकी भारतीय जनता पक्षाने शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत 160 तालुका पंचायतींमध्ये बहुमत मिळविले आहे. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मतगणना केली जात होती. आज बुधवारी सकाळपर्यंत सर्व परिणाम हाती येण्याची शक्यता आहे. मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षाही यावेळी भारतीय जनता पक्षाने अधिक यशाची प्राप्ती केली आहे. आता गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्वीपेक्षाही अधिक बळकट झाला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ वरील संदेशात व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या यशासाठी कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आहे.

Comments are closed.