आता नाही तर कधीच नाही! मुंबईसमोर अस्तित्वाची लढाई; आज हैदराबादविरुद्ध लढा

बुधवारचा वानखेडे स्टेडियमवरचा सामना ज्यात एका संघासाठी ‘जगणे’ आणि दुसऱयासाठी ‘राज्य करणे’ ठरणार आहे. मुंबई इंडियन्ससमोर जिंका किंवा स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडा, हेच सावट आहे. सात सामन्यांत फक्त दोन विजय मिळवलेल्या पाच वेळा विजेत्या मुंबईसमोर आता पराभवाला जागा नाही. सहा पराभवांनंतर बाद फेरी गाठणे म्हणजे मृगजळच आणि मुंबई त्या उंबरठ्यावर उभी आहे. हार म्हणजे बाहेर. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, याच ध्येयाने मुंबईला हैदराबादविरुद्ध लढावे लागणार आहे.

या हंगामात मुंबईचा खेळ म्हणजे विसंगतीचं उदाहरण. फलंदाजी आणि गोलंदाजी कधीच एकत्र दिसली नाही. हार्दिक पंडय़ापुढे आता खरी कसोटी आहे, हा विखुरलेला ताफा एकत्र करून मैदानावर उभं करणं. रोहित शर्माची उपस्थिती वरच्या फळीला दिलासा देत असली तरी डावाला वेग आणि धार देण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववरच आहे.

बुमराची धार कुठे हरवली?

जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमण अपेक्षेइतपं भेदक ठरलेलं नाही. सुरुवातीच्या विकेट नाहीत, मधल्या षटकांत नियंत्रण नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी मुंबईला चांगलंच झोडपलं. हीच उणीव भरून काढली नाही, तर स्पर्धेचा

पडदा लवकरच पडणार

सनरायझर्स हैदराबादचा खेळ म्हणजे आत्मविश्वासाचं प्रतीक. आठ सामन्यांत पाच विजय आणि गुणतालिकेत वरचं स्थान. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आक्रमकता आणि संयम यांचा अचूक मेळ साधला आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेडची स्पह्टक सुरुवात, तर हेन्रीक क्लासनची मधल्या फळीतील धडाकेबाज फटकेबाजी हैदराबादचा डाव सतत 200 च्या पुढे नेत आहे.

इतिहास मुंबईच्या बाजूने, पण…

हैदराबादविरुद्धच्या लढतीत मुंबईचे पारडे नेहमीच जड ठरलेय. मागील सहा पैकी पाच सामन्यात मुंबईच जिंकलीय, पण सध्याचा फॉर्म पाहता हा इतिहास फारसा उपयोगी पडेलच असे नाही.

वानखेडेची धावांची खाण

वानखेडेची खेळपट्टी म्हणजे फलंदाजांसाठी स्वर्ग. लहान सीमारेषा, सपाट खेळपट्टी आणि सरासरी 187 धावा. पाठलाग करणाऱया संघांना थोडा फायदा मिळाल्याने नाणेफेक निर्णायक ठरू शकते. रात्रीच्या प्रकाशात चेंडूची हालचाल लक्षात घेता कर्णधार आधी गोलंदाजी करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पहिला खेळणारा संघ दोनशेच्या पुढे धावा करतो तर पाठलाग करणाऱया संघाची काही खैर नाही.

Comments are closed.