IPL 2026: यवतमाळच्या पोराने गाजवले चंदीगडचे मैदानं! राजस्थान रॉयल्ससाठी पंजाब किंग्जच्या हातातून हिसकावला विजय
आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२८ एप्रिल) चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स भिडले. यामध्ये आरआरने पीबीकेएसला त्यांच्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करून दिला. २२३ लक्ष्याचा पाठलाग करताना आरआरला यशस्वी जायस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी नेहमीप्रमाणे धमाकेदार सुरूवात करून दिली. सामन्याचाही शेवट त्यांनी तसाच जबरदस्त केला. हा सामना आरआरने ६ विकेट्सने जिंकला. त्यांच्या या विजयाचे शिल्पकार ठरले, डोनोवन फेरेरा आणि शुभम दुबे.
या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या दुबेने महत्त्वपूर्ण खेळी केली. फेरेरासोबत आरआरसाठी पीबीकेएसच्या हातातून विजय हिसकावून आणणारा दुबे नेमका कुठला, कोण हे जाणून घेऊ. त्याचा जन्म २७ ऑगस्ट १९९४ ला विदर्भाच्या यवतमाळमध्ये झाला. तो एक फिरकीपटू असून डाव्या हाताने फलंदाजी करतो. तो मिडल-ऑर्डरमधील फलंदाज असून टी२० मध्ये फिनिशरची भुमिका निभावतो.
दुबे स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो. त्याने ३ प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून ७५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए च्या १२ डावांमध्ये २५४ धावा केल्या असून त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने टी२० मध्ये ४१ सामने खेळले असून त्यातील ३६ डावांत फलंदाजी करताना ८०८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
दुबेने २०२४ मध्ये आयपीएल पदार्पण केले आहे. त्याने आरआरकडून पदार्पण करताना आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत. त्यातील १३ डावांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहून आरआरने त्याला ५.८ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले, मात्र २०२५ मध्ये त्याला मुक्त करण्यात आले.
दुबेला २०२५ च्या हंगामासाठी कोणी रुची दाखवली नाही. आरआरने त्याला ८० लाख रुपयांना संघात घेतले आणि २०२६ हंगामासाठी रिटेन केले.
या सामन्यात पीबीकेएसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरआरने चांगली सुरूवात केली होती, मात्र १४ षटकानंतर त्यांची स्थिती ४ विकेट्स ५१ धावा अशी झाली होती. अशावेळी फेरेरासोबत दुबेने फटकेबाजी करत संघाचा केवळ धावफलकच हलता ठेवला नाही तर विजयही निश्चित केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३२ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली.
दुबेने १२ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ३१ धावा केल्या. फेरेराही २६ चेंडूत ५२ धावा करत नाबाद राहिला. हा सामना जिंकल्याने आरआर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी तर पीबीकेएस पहिल्या स्थानी कायम आहेत.
Comments are closed.