श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ; अध्यक्ष शम्मी सिल्वा यांच्यासह बोर्डाच्या सर्व सदस्यांचा राजीनामा! नेमकं प्रकरण काय?
श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे (SLC) अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबत संपूर्ण कार्यकारी समितीनेही सामूहिकपणे पदे सोडली आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 29 एप्रिल रोजी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. अध्यक्ष शम्मी सिल्वा आणि संपूर्ण कार्यकारी समितीने दिलेले राजीनामे त्वरित स्वीकारण्यात आले आहेत. 28 एप्रिल रोजी झालेल्या कार्यकारी बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या दबावानंतर हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच बोर्डात बदल करण्याचे संकेत दिले होते. सरकार आणि सामान्य जनता गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट बोर्डात बदल करण्याची मागणी करत होती.
आता बोर्डाचा कारभार एक ‘अंतरिम समिती’ (Interim Committee) सांभाळणार आहे. सरकार माजी खासदार एरन विक्रमरत्ने यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याची शक्यता आहे. हा निर्णय श्रीलंकेसाठी अडचणीचा ठरू शकतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) केवळ स्वतंत्र आणि लोकशाही पद्धतीने निवडलेल्या बोर्डालाच मान्यता देते. याआधीही जेव्हा श्रीलंकेत सरकारने अंतरिम समिती नेमली होती, तेव्हा ICC ने बोर्डाचा निधी रोखला होता आणि काही स्पर्धांचे यजमानपदही काढून घेतले होते. आता पुन्हा एकदा सरकारचा हस्तक्षेप वाढल्यास श्रीलंका क्रिकेटवर बंदी किंवा कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
शम्मी सिल्वा यांचा कार्यकाळ पाहिला तर, शम्मी सिल्वा 2019 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते.
त्यांनी सलग चार कार्यकाळ (सुमारे 7 वर्षे) अध्यक्षपद भूषवले, त्यापैकी तीन वेळा त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या काळात श्रीलंका संघाने (पुरुष आणि महिला) आशिया चषक जिंकला, पण आयसीसी स्पर्धांमध्ये पुरुष संघाची कामगिरी खालावली. 2026 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही श्रीलंका संघ लवकरच स्पर्धेतून बाहेर पडला होता. सरकारी दबावामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या संपूर्ण समितीने राजीनामा दिला आहे, मात्र यामुळे आयसीसीकडून श्रीलंकेवर कारवाई होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Comments are closed.