दानवेंच्या उमेदवारीवरुन मविआत फूट,काँग्रेस उमदेवार देणार, सपकाळ नेतृत्त्वासोबत चर्चा करणार
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत फूट पडणार की काय असं चित्र निर्माण झालं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार नसल्यानं काँग्रेस देखील उमेदवार देऊ शकते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत पक्ष नेतृत्त्वासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या या निर्णयावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. कॉंग्रेस विधानपरिषेदेत आपला उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवाराचं नाव जाहीर करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर करताना चर्चा केली नाही, असं म्हटलं. काँग्रेसनं पाठिंबा फक्त उद्धव ठाकरे यांच्या नावाला दिला होता. नवं नाव कोणतं आलं असेल, चर्चा न करता ते पुढं गेलं असेल तर योग्य नाही. किमान चर्चा तरी आमच्यासोबत व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दोन वर्षात राज्यसभा आणि विधानपरिषद सोबत येणार आहे, त्यावेी काय होणार हे स्पष्ट झालं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाई जगताप काय म्हणाले?
काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी या सर्व घडामोडींबाबत भूमिका मांडली आहे. काँग्रेस कदाचित आपला उमेदवार देईल. आतापर्यंत आमच्या चर्चा सुरु होत्यात त्यात एक गोष्ट जाहीर होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत आहेत. प्रांताध्यक्ष यासंदर्भातील अधिकृत घोषणा करु शकतात. कदाचित काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करेल, असं भाई जगताप यांनी सांगितलं.
अंबादास दानवे काय म्हणाले?
काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता अंबादास दानवे यांनी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे… एवढं मला माहिती आहे. असं म्हटलं. बाकी पक्ष नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे भूमिका मांडतील. मी उमेदवार आहे, काँग्रेसशी मी कसा बोलणार, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले संजय राऊत यांचं ट्वीट बघा, महाविकास उमेदवार म्हणाले म्हणजे काँगेसशी बोलले असणार ना? आता काँग्रेसशी मी काय बोलणार? मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिली बाकी पक्ष नेतृत्व जबाबदारी घेईल, असं अंबादास दानवे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.