Sports News – 34 व्या एल. आय. सी. कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे 2 मे पासून आयोजन
मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी प्रतिष्ठित ‘३४ वी एल. आय. सी. कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा २०२६’ येत्या २ मे पासून सुरू होत आहे. न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) मान्यतेने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा २ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध मैदानांवर खेळवली जाईल. ‘युथ टॅलेंट सर्च’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन हिंदस्थानी महिला कसोटीपटू सायली सातघरे आणि एल. आय. सी. चे अधिकारी योगेंद्र वैती यांच्या हस्ते २ मे रोजी सकाळी ८:३० वाजता माटुंगा येथील मेजर रमेश दडकर मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेसाठी १६ वर्षांखालील मुलांच्या १६ संघांची विभागणी ४ गटांत करण्यात आली असून २ मे व ३ मे रोजी पहिली फेरी रंगणार आहे. स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे आहेत:
गट ‘अ’: बोरिवली, कांदिवली, चर्चगेट आणि कलीना केंद्र (सामने: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब, माटुंगा आणि एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, कलीना).
गट ‘ब’: एम.सी.ए. अकॅडमी, घाटकोपर, माटुंगा आणि वाशी केंद्र (सामने: आर.सी.एफ. स्पोर्ट्स क्लब, चेंबूर आणि माटुंगा जिमखाना).
गट ‘क’: डोंबिवली, ठाणे, कल्याण आणि बदलापूर केंद्र (सामने: डी.पी.सी.सी. आणि डी.पी.झेड.सी.सी., माटुंगा).
गट ‘ड’: पालघर, बोईसर, मिरा रोड आणि विरार केंद्र (सामने: टाटा स्टील क्रिकेट ग्राउंड, पालघर आणि यशवंत नगर क्रिकेट ग्राउंड, विरार).
या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणजे हिंदुस्थानचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार आयुष म्हात्रे यांनी याच स्पर्धेतून आपल्या क्रिकेटचा पाया रचला आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ मे रोजी सायं. ४:३० वाजता अजिंक्य नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांना, तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात येईल. सर्व खेळाडू व पंचांना न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्यात आले असून, आयोजक चंद्रकांत कोळी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कंबर कसली आहे.
Comments are closed.