Konkan News – चार फूट खोल डोहात अडकलेल्या रानगव्याला वनविभागाकडून जीवदान, ग्रामस्थांच्या मदतीने राबविली बचाव मोहीम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूण तालुक्यातील ओवळी सुकविलवाडी येथे एका ४ ते ५ फूट खोल नैसर्गिक डोहात अडकलेल्या रानगव्याची वनविभागाने सुरक्षित सुटका केली आहे. ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने राबविलेल्या या बचाव मोहिमेनंतर रानगव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून, वनविभागाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२८ तारखेला ओवळी येथील ग्रामस्थ लक्ष्मण झोरे हे सायंकाळी ४ च्या सुमारास गुरे चरण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका नैसर्गिक डोहात एक रानगवा अडकलेला दिसून आला. ही माहिती त्यांनी तातडीने ओवळी गावचे पोलीस पाटील अजिंक्य शिंदे यांना दिली,ज्यांनी तत्काळ वनविभागाला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर यश घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळ वस्तीपासून दूर असल्याने पथकाला सुमारे दीड तास चालत जावे लागले. रानगवा डोहात अर्धवट बुडालेल्या अवस्थेत होता. वनविभागाने रानगव्याला बाहेर काढण्यासाठी डोहात दगड टाकून त्याची उंची वाढवण्याची रणनीती आखली.डोहाभोवतीचे दगड जमा करून सुरक्षित अंतरावरून ते डोहात टाकण्यात आले.दगडांमुळे डोहाची उंची वाढली आणि रानगव्याला बाहेर पडण्यासाठी एक नैसर्गिक मार्ग तयार झाला.या मार्गाचा अवलंब करून रानगवा डोहाबाहेर आला आणि थेट जंगलात निघून गेला. अंदाजे ६ ते ७ वर्षे वयाचा हा नर जातीचा रानगवा पूर्ण वाढ झालेला होता. ही बचाव मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही मोहीम विभागीय वन अधिकारी (चिपळूण) श्रीम. गिरीजा देसाई पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये खालील सदस्यांचा समावेश होता.त्यामधे परिक्षेत्र वनाधिकारी एस.एस.खान, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले आणि वाहनचालक नंदकुमार कदम व अजय बडदे.पोलीस पाटील अजिंक्य शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप शिंदे, तसेच ग्रामस्थ सचिन शिंदे, शुभम शिंदे, संतोष शिंदे, लक्ष्मण झोरे, जानू झोरे आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी या कार्यात मोलाचे योगदान दिले.

Comments are closed.