Ratnagiri News – चिपळूण शहरातील प्रलंबित कामे आणि प्रशासकीय दिरंगाई विरोधात शिवसैनिकांचा संताप, मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला
शहरातील प्रलंबित विकासकामे आणि प्रशासनाकडून होणारी दिरंगाई या विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवसेना शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेऊन निवेदनांच्या माध्यमातून विविध ज्वलंत प्रश्न उपस्थित केले.
बहादूरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानचा मंजूर रस्ता अर्धवट ठेवण्यात आल्याने नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच, महानगर गॅस कंपनीने पाईपलाईनचे काम केल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे उघडेच ठेवले असून, कंपनीने दुरुस्तीसाठी आगाऊ रक्कम भरूनही नगरपरिषदेने ते न बुजवणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याचे शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले.
यासोबतच, ‘रम्बलर स्ट्रीप’च्या कामात संबंधित ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. केवळ 60 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या कामासाठी दोन वेळा मुदतवाळ देऊनही काम अपूर्ण असल्याने, संबंधित ठेका तातडीने रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी करण्यात आली. याव्यतिरिक्त मुरादपूर येथील रस्त्यांची दुरवस्था, ग्रॅव्हिटी पाईपलाईन योजनेची संथ गती आणि महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडच्या समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सर्व प्रश्नांची दखल घेत मुख्याधिकारी संजय जाधव यांनी संबंधितांना नोटिसा बजावणे, कामचुकार ठेकेदारांचे ठेके रद्द करणे आणि सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुका समन्वयक राजू देवळेकर, उपशहर प्रमुख संजय रेडीज यांच्यासह शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.