धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, गर्भपात रॅकेट, 10 वी पास दाम्पत्यास अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशीदपुरा (संभाजीनगर) भागात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या (Police) छाप्यात या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झाला. धक्कादायक बाब म्हणजे, गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतून मागील नाल्यात फेकले जात होते आणि भटक्या कुत्र्यांकडून त्यांची विल्हेवाट लावली जात होती. याप्रकरणी एका सतर्क महिलेच्या फोननंतर पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपूर्वी बीडमधील मुंडे दाम्पत्याकडून होत असलेल्या गर्भपात घटनेचा उलगडा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. महिलांचे अवैधपणे गर्भपात करुन पैशाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. आता, छत्रपती संभाजीनगरातही असाच धक्कादायक आणि निर्दयी प्रकार उघडकीस आला आहे. 10 वी उत्तीर्ण दाम्पत्याने आपल्या घरातच मिनी ऑपरेशन थिएटर उभारून गेल्या पाच वर्षांपासून अवैध गर्भपाताचा क्रूर व्यवसाय सुरू ठेवला होता. महिलांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार सोमवारी पोलिसांच्या कारवाईत उघड झाला. आरोपी वारंवार घर बदलून हा व्यवसाय हे दाम्पत्य सुरू ठेवत होते.

शहरातील रशीदपुरा परिसरात गर्भपात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, एका 24 वर्षीय विवाहितेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

घरातच 24 प्रकारची मशिनरी

तपासणीदरम्यान घरात सापडलेल्या साहित्याने आरोग्य पथकही हादरले. मोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक वैद्यकीय साधने येथे उपलब्ध होती. तब्बल 24 प्रकारची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासा झाला असून मुलगी असल्याच्या संशयावरून गर्भपात करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात गर्भात मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गर्भपातासाठी लागणारी औषधे कुठून आणली जात होती, याचाही तपास सुरू आहे. अर्भकांची विल्हेवाट नाल्यात फेकून लावली जात असल्याचेही पोलीस तपासातून उघड झाले आहे.

हेही वाचा

संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.