प.बंगालमध्ये ममता ‘दीदींना’ विजयाचा विश्वास,पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज,भाजपला किती जागा?
मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोलमधून (West bengal Exit Poll) राज्यात कोणाची सत्ता येणार, कोण होणार पश्चिम बंगालचा किंग, ममता दीदी (ममता बॅनर्जी) गड राखणार की मोदींच्या नेतृत्वात भाजपचं कमळ खुलणार याची आकडेवारी समोर आली आहे. विविध एजन्सीच्या एक्झिट पोल आकडेवारीतून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्यामध्ये, दीदींचा झटका बसणार असून वाढीव मतदानाचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन होईल. तर, पोल डायरीच्या आकडेवारीनुसार देखील भाजप बहुमताचा आकडा गाठत असल्याचं दिसून येत आहे.
बंगालमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहता सरकारी 92 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर आलेल्या एक्झिट पोलमधून ममता बॅनर्जींच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते, प. बंगालमधील 294 जागांपैकी 146 ते 161 जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवरच थांबावे लागणार असल्याचं दिसून येते. तर, काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असा एक्झिट पोल आहे. आता, पोल डायरीचीही आकडेवारी समोर आली असून भाजपलाच बहुमत मिळत असल्याचा अंदाज आहे.
पोल डायरीची आकडेवारी
पोल डायरीच्या आकडेवारीनुसार प. बंगालमध्ये 294 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 142 ते 171 जागा मिळू शकतात, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) 99 ते 127 जागांवर विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराचा अंदाज वर्तवला जात असून मोठा फेरबदल राज्यात पाहायला मिळू शकतो. मतांच्या टक्केवारीकडे पाहिल्यास भाजपला सुमारे 45.87% मते मिळण्याचा अंदाज आहे, तर TMC चा मतांचा वाटा 40.32% इतका राहू शकतो. काँग्रेसला 3 ते 5 जागा आणि सुमारे 4.59% मते मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. डाव्या आघाडीला (Left Front) 2 ते 3 जागा आणि सुमारे 7.47% मतांचा वाटा मिळू शकतो. इतर पक्षांना अत्यल्प म्हणजे 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
2021 मधील अंदाज ठरला फोल
दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचाही अंदाज पोल डायरी या संस्थेनं वर्तवला होता. त्यामध्ये, भाजपला 148 ते 187 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, गत निवडणुकीत भाजपला 77 जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर, ममता बॅनर्जींनी 215 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता.
हेही वाचा
पश्चिम बंगालमध्ये ममता ‘दीदी डेंजर झोन’मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
आणखी वाचा
Comments are closed.