‘दादा नाहीत, लिहून ठेवा मी पवार विरुद्ध पवार घरात होऊ देणार नाही, वेळ पडलीच तर..’ माझा व्हिजनमध

Supriya Sule Majha Vision: बारामती पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. जय पवार (Jay Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे 2029 साली बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आता यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय. आपल्या महाराष्ट्राचा यंदा 67 वा वर्धापन दिन असून यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नाव बदलून क्रांती होणार आहे का? केईएमचे नाव बदलण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही, तिथे जाणाऱ्या पेशंटमध्ये, डॉक्टरमध्ये मला इंटरेस्ट आहे. त्या नावात किती महत्त्व आहे, यात मला इंटरेस्ट नाही. तिथली सर्विस सुधारण्यात मला इंटरेस्ट आहे.

रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा यायलाच हवी असा आग्रह सरकारकडून केला जात आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण कुठल्याही राज्यात गेलो तर तिथली स्थानिक भाषा लोक शिकतात. लोकांना भाषेचा अभिमान असतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असतो. शक्ती आणि मारामारी अशी कटूता का? त्यांना प्रेमाने सांगा ना. आपण तीच गोष्ट प्रेमाने सांगू शकतो. टॅक्सी ड्रायव्हरला मराठी आलीच पाहिजे ही भूमिका असावी. पण, सर्वांना वेळेवर टॅक्सी मिळणे, रिक्षा मिळणे आणि तो व्यक्ती त्यांच्याशी उर्मटपणे न वागणे, असे झाले तर जास्त आनंद वाटेल, असे त्यांनी म्हटले.

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी सांगितला टॅक्सीचा किस्सा

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कालच मला त्याचा अनुभव आला आहे. काल मी स्वतः प्रभादेवीला गेले होते. मी 22 मिनिट एका टॅक्सीसाठी थांबले. माझी पैसे भरायची तयारी होती. पण, त्याला महालक्ष्मीला यायचे नव्हते. योगायोगाने माझ्यासोबत एक मुलगी थांबली, तिला माझ्यापेक्षा जास्त गरज होती. एखाद्या व्यक्तीला एखादी ट्रॅक्सी मिळण्यासाठी जर इतका त्रास होत असेल. मंत्र्यांनी मराठी आली पाहिजे या वादात जरूर पडावं. पण, तो टॅक्सीवाला रोज सगळ्यांसाठी हजर असला पाहिजे आणि त्यांनी उर्मटपणा न करता हो म्हटले पाहिजे. यात सर्वांना जास्त आनंद वाटेल, असे देखील त्यांनी म्हटले.

Supriya Sule on Vidhan Parishad Election 2026: काँग्रेस आणि शिवसेनेचा उत्तम संवाद

दरम्यान, ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील आता विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही राजकारणात आहोत, आम्ही एनजीओ चालवत नाही. आम्ही चर्चेने निर्णय घेतो, आम्हाला फोन येत नाहीत. मतभेद असले तरी चर्चा होते. काँग्रेसने अजून उमेदवार दिलेला नाही. केरळात आम्ही काँग्रेस विरोधात लढलो. काँग्रेस उमेदवार देणार की नाही हे बघू, प्रयत्नांती परमेश्वर… काँग्रेस आणि शिवसेनेचा उत्तम संवाद आहे. राहुल गांधी आणि संजय राऊतांची केमिस्ट्री वेगळी आहे. गांधी आणि ठाकरे फॅमिलीचे संबंध चांगले आहेत, असे त्यांनी म्हटले.

Supriya Sule on NCP Merger: विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातला

अजित पवारांच्या अपघाताला तीन महिने झाले आहेत. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुठल्याही कुटुंबातील कर्ता पुरुष जेव्हा अचानक जातो, तेव्हा ते इमोशन्स प्रत्येक घरात असतात. तसेच इमोशन्स आमच्या घरात देखील आहेत. पण एक फरक जाणवतो तो म्हणजे आपण बाहेर जाऊन ते इमोशन्स दाखवत नाहीत. आमच्या वडिलांची सर्वात मोठी खासियत अशी आहे की, घरात आणि घराच्या बाहेर ते सेमच वागतात. ते कधीही स्वतःचे इमोशन्स कुणाला दाखवत नाहीत. ते खूप कमी बोलतात. त्यांच्या मनात काय चालले आहे हे खूप कमी लोकांना माहीत असतं, असे त्यांनी म्हटले.  राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या याचे काहीच स्टेटस नाही. विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातला विषय होता. आता दादाच राहिला नाही तर विलिनीकरणाचा विषय कुठे राहणार, असे देखील त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे: मी कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही

2029 ला बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार का? याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2029 मधे काय होईल, कसं होईल, आघाड्या कशा होतील? हे माहिती नाही. त्यावेळच त्यावेळी पाहूयात. मी कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईल पण हे परत मी होऊ देणार नाही. गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची मुलं आणि नातवंड आहेत, त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Supriya Sule: आम्ही बोकड खातो आणि ते छान लागते

अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी दादांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांच्या घराबाहेर अघोरी कृत्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते दोघं करत असतात. पण, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. मला या स्टेटमेंटनंतर प्रचंड ट्रोलिंग होणार आहे. पण, मला ट्रोलिंगची भीती वाटत नाही. आम्ही बोकड खातो आणि ते छान लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आणखी वाचा

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, ‘मविआचे भविष्य…’

आणखी वाचा

Comments are closed.