कशेडी घाटात खेड-बोरिवली एसटी बसचा भीषण अपघात; ब्रेक फेल होऊन बल्कर ट्रकला धडक, 13 प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड डेपोच्या खेड-बोरिवली एसटी बसचा भीषण अपघात घडला. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी समोर उभ्या असलेल्या बल्कर ट्रकवर जोरदार धडकली. या अपघातात ट्रक चालकासह बसमधील 12 ते 13 प्रवासी जखमी झाले. काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील भोगाव येथे घडला.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी एका बाजूला खोल दरी असून बस थोडक्यात दरीत कोसळण्यापासून बचावली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. कशेडी घाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता खचण्याच्या घटना समोर येत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या जुन्या घाटमार्गावरील वाहनांची वर्दळ कमी झाली असली तरी घाट परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांच्या सोयीसाठी खेड डेपोच्या काही एसटी बसेस अजूनही याच मार्गावरून धावत असतात.

भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी एसटी बस आली असता अचानक बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. स्थानिकांकडून महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची पुरेशी सुरक्षितता पाळली जात नसल्याची चर्चा होती.

अपघाताची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना मदत केली. कशेडी टॅप येथील वाहतूक पोलीस व पोलादपूर पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. या घटनेमुळे घाटातील रस्ते सुरक्षा, सुरू असलेली कामे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments are closed.