डोंबिवलीत पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं, तब्बल 12 वर्षानंतर आरोपी रील स्टारचा कारनामा उघड
Dombivli Crime News : तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा, घटक-03 च्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणामुळं रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू या तिघांना अटक करण्यात आली आहे. सात एकर जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून करण अरविंद बागुल या तरुणाची हत्या करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट मुरबाड येथील जंगलात लावल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली . काही दिवसापूर्वी कुख्यात रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या घरी शस्त्रांचा साठा सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली (डोंबिवली)पूर्वच्या दावडी येथील 23 वर्षीय तरुणाचे 2014 मध्ये अपहरण झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला. कल्याण क्राईम ब्रँच पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या पथकाने कसून केलेल्या चौकशीत त्याने इतर साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली. रील स्टार सुरेंद्र पाटील आणि मयत करण बागुल याच्यासोबत जमीन विकासाच्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून 4 ऑक्टोबर 2014 रोजी त्याचे अपहरण करून त्याला दावडी येथील पाटील याच्या एका कार्यालयात नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी पाटील याने लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन त्याची विल्हेवाट लावली.
तीन आरोपींना अटक, 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात मुरबाड पोलिस ठाण्यात त्या काळात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाशी संबंधित नोंदी तपासून तोच मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली. त्यानुसार मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून व पुरावा नष्ट करण्याची कलमे जोडण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Kolhapur Crime News: जामिनावर सुटताच नराधमाचं भयानक कृत्य, महिलेला धर्मांतरासाठी दबाव अन् जिवे मारण्याची धमकी; कोल्हापुरातील संतापजनक घटना
आणखी वाचा
Comments are closed.