सिताराम पवार यांचे स्मारक होईल तेव्हा होईल, आधी नीट रस्ता तरी करून द्या; माथेगुजर ग्रामस्थांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आला की, सर्वप्रथम आठवण येते ती १०६ हुतात्म्यांची. या हुतात्म्यांच्या यादीत अगदी पहिले नाव आहे ते दापोलीतल्या माथेगुजर या गावचे सुपुत्र सिताराम बनाजी पवार यांचे. या हुतात्म्याच्या माथेगुजर गावी त्यांचे स्मारक उभारले गेले तर किमान नव्या पिढीला त्यांचं हौताम्याचं महत्व तरी कळेल. पण असं स्मारक तर सोडा त्यांच्या माथेगुजर या गावात साधा डांबरी रस्ताही नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी बलिदान केले. मात्र, त्यातल्या कित्येक हुतात्म्यांच्या बलिदानाची कहाणीच आपल्याला माहीती नसते. सिताराम बनाजी पवार हे या चळवळीतले पहिले हुतात्मा. हुतात्मा चौकातल्या श्रध्दांजलीची नामावळी त्यांच्या नावानेच सुरु होते. त्यापलीकडे त्यांच्या फारशा स्मृती आज कुणालाच माहिती नाहीत.

वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीत हुतात्मा झालेल्या हुतात्मा सिताराम बनाजी पवार यांचे मुळ गाव दापोली तालुक्यातील माथेगुजर हे आहे. दापोली दाभोळ मार्गावरील लाटीमाळ येथून नानटे चिंचवाडीतून पुढे माथेगुजर या गावात जाण्याचा रस्ता आहे. माथेगुजर गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता कित्येक वर्षे डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिकांना तर जा ये करणे त्रासाचे होते. मात्र, माथेगुजर येथे येणाऱ्या पर्यटक, इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक तसेच अभ्यासकांना येथे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हुतात्मा सिताराम बनाजी पवार यांचे घर असल्या ठिकाणी केवळ तालुका वा जिल्हयातूनच येथे येणारे नसतात तर राज्यभरातून येथे येणारे असतात. माथेगुजर गावात जाण्यासाठी अजूनही धड रस्ता झालेला नाही. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या जीवाची बाजी लावून हौतात्म्य पत्करले त्या हुतात्म्यांच्या गावातील घराकडे जाणारा धड रस्ता नसावा यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.

Comments are closed.