पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ९२% मतदान झाले
2011 चा विक्रम मोडला : निवडणूक आयुक्तांकडून मतदारांचे कौतुक : ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर हल्ला
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील सर्व 294 जागांवर विक्रमी 92.84 टक्के मतदानाची नोंद झाली. बुधवारी, दुसऱ्या टप्प्यात 142 जागांवर 92.48 टक्के मतदान झाले. यापूर्वी, 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 152 जागांवर 93.19 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली होती. बंगालच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी, 2011 मध्ये बंगालमध्ये 84.72 टक्के मतदानाची नोंद झाली होती. पुरुषांपेक्षा (91.07 टक्के) महिलांनी (92.28 टक्के) जास्त मतदान केले. मतदानाचा टक्का वाढण्यासोबतच यावेळी निवडणूक हिंसाचारामुळे एकही मृत्यू झाला नाही हेसुद्धा या निवडणुकीचे वैशिष्ट्या ठरले आहे.
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी आणि केरळ, आसाम व पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान झाले. या पाच राज्यांमध्ये केरळमध्ये सर्वात कमी 78.03 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व राज्यांचे निवडणूक निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील. 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने मतदानाचे सर्व मागील विक्रम मोडले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्याच्या मतदारांचे कौतुक करत या निवडणुकीला ‘स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सार्वजनिक सहभागाची निवडणूक’ असे म्हटले आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर शाब्दिक हल्ला केला आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय दलांवर पक्षपाताचा आरोप केला.
केंद्री निवडणूक आयोगाच्या मते, 2011 च्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदान झाले होते, परंतु यावेळच्या आकडेवारीने तो विक्रम मोठ्या फरकाने मोडला आहे. 2016, 2021 आणि 1996 च्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदानाचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते. दुसऱ्या टप्प्यात 140 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झाले, ज्यात अनेक जिह्यांनी अपवादात्मक कामगिरी केली. पूर्व बर्धमान आघाडीवर होता, तर हुगळी, नादिया आणि उत्तर व दक्षिण 24 परगणा यांसारख्या जिह्यांमध्येही उच्च मतदान झाले. कोलकाताच्या शहरी भागांमध्ये, जिथे सहसा कमी मतदान होते, तिथेही अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले.
तणावपूर्ण वातावरणात शांततापूर्ण मतदान
निवडणुकीदरम्यानचे वातावरण पूर्णपणे शांत नसले तरी, हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडल्या नाहीत. प्रशासनाच्या मते मतदान प्रक्रिया एकूणच नियंत्रित आणि तुलनेने शांततापूर्ण होती. निवडणुकीदरम्यान विविध भागांतून तुरळक वादाच्या घटनाही घडल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचे आरोप झाले, तर काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे. काही भागांत केंद्रीय दलांना हस्तक्षेप करावा लागला.
77 मतदान केंद्रांवर फेरमतदानाची मागणी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर, 77 मतदान केंद्रांवर फेरमतदानाच्या मागणीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. आयोग या तक्रारींची गांभीर्याने चौकशी करत आहे. दक्षिण 24 परगणा जिह्यातील चार मतदारसंघांमधून आलेल्या तक्रारींमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार, कॅमेऱ्यात हस्तक्षेप आणि मतदान प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांचा समावेश आहे. सखोल चौकशीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, परंतु हे प्रकरण हलक्यात घेतले जात नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. चार विधानसभा मतदारसंघांमधून मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. फाल्टा येथून 32 तक्रारी दाखल झाल्या असून डायमंड हार्बर येथून 29 तक्रारी आल्या आहेत.
Comments are closed.